मुंबई : भाजप नेते महसूलमंत्री चंद्रशेखर वाबनकुळे स्वत:च्याच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना फोन टॅपिंगची धमकी देत आहेत. हा गंभीर गुन्हा असून त्यांनी फोन टॅपिंग करतो अशी कबुलीच दिली आहे. उद्या फडणवीस यांचे विरोधक असलेले देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचेही फोन टॅप केले जातील, अशी भीती व्यक्त करीत बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर इंडियन टेलिग्राफ ॲक्टखाली गुन्हा नोंदवून त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मंत्री बावनकुळे यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना बजावताना भाजप पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याने बेईमानी केली तर याद राखा, सर्वांचे फोन सर्व्हिलन्सवर टाकलेले असून तुम्ही व्हॉटस्ॲपवर कोणाशी काय बोलता, कोणाशी काय संवाद साधता हे सर्व आम्हाला कळते, असा इशारा दिला होता. यावरून संजय राऊत यांनी निशाणा साधला. हा विषय फक्त भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संबंधित नसून विरोधी पक्षाचे फोनही टॅप करून एकले जात आहेत. त्यांचे व्हाटस् ॲप पाहिले जात आहेत, हे आता बावनकुळे यांनी सांगितले आहे.
त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. विरोधी पक्षाचे, स्वत:च्या कार्यकर्त्यांचे, सहकारी पक्षाचे फोन टॅप करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. फोन टॅपिंगमध्ये पत्रकार, फडणविस विरोधी गटाचे, शिंदे गट, अजित पवार गट, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस नेते आणि मी सुद्धा असेन, असे सांगतानाच ते अमित शाह यांचाही फोन टॅप करीत असतील, कारण अमित शाह हे फडणवीस यांच्याविरोधात आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
त्यामुळे हा गुन्हा फडणवीस यांना गंभीर वाटत असेल तर त्यांनी बावनकुळे यांना बडतर्फ करून, गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. याआधी २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार येत असतानाही असे प्रकार झाले आहेत. त्याबाबत सरकारने गुन्हे दाखल करून चौकशी सुरू केली होती. त्याचे सुत्रधार देवेंद्र फडणवीस आणि तेव्हाच्या पोलीस महासंचालक होत्या. हा अटकेचा आणि कठोर शिक्षा देण्याचा हा गुन्हा आहे. म्हणून त्यांना अटकेची भीती होती. मात्र, सरकार बदलल्यामुळे गुन्हेगारांना क्लीन चिट देत त्यांना प्रमोशन देण्यात आले, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
बावनकुळे आणि त्यांची भाजपची टीम रवींद्र चव्हाण, मुंबईतील काही बिल्डर, नागपूर व पुणे येथे काही यंत्रणा यांनी फोन टॅप करण्याचे मशिन्स लावले आहेत. त्याला ते वॉर रूम बोलत आहेत. हे भाजपाचे खासगी व्हिजिलन्स ऑफीस असून तेथून भाजप, शिंदे गट, अजित पवार, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) अशा सर्व पक्षाचे नेते त्यांच्या सर्व्हिलन्सवर आहेत, असा आरोप करीत तेथे पेगॅसिसपेक्षा अद्ययावत मशिन्स आहेत, असाही आरोप राऊत यांनी केला.
