शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी अटक केली.  राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. ईडीला राऊत यांच्या घरी सापडलेल्या रोख रक्कमेसंदर्भातही एक मोठा खुलासा समोर आल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

नक्की वाचा >> संजय राऊत यांच्या अटकेस कारणीभूत ठरलेलं १०३९ कोटींचं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय? कोणी आणि कसा वळवला पैसा?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१० लाखांच्या बंडलवर शिंदेंचं नाव
संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी अधिकारी दाखल झाले. सुमारे दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही येथेही ‘ईडी’कडून शोधमोहीम राबवण्यात आली. नऊ तास सुरु असणाऱ्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. डीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार जप्त करण्यात आलेल्या या रक्कमेपैकी १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदेंच्या नावासंदर्भात राऊतांनी केला खुलासा
एकूण ११ लाख ५० हजार रुपये राऊत यांच्या घरामध्ये सापडले. त्यापैकी १० लाख रुपयांचे नोटांचे बंडल असणाऱ्या कव्हरवर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदार, खासदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास वेगळ्या दिशेने जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र यासंदर्भातील खुलासा करताना राऊत यांनी हे पैसे शिवसेना नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी बाजूला काढण्यात आल्याचा दावा केल्याचंही या वृत्तात म्हटलंय.

नक्की वाचा >> “राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी…”; राऊतांविरोधातील कारवाईचा उल्लेख करत सेनेचा भाजपावर हल्लाबोल

आधी घरी चौकशी मग कार्यालयात चौकशी…
रविवारी झालेल्या या कारवाईच्या पूर्वी ‘ईडी’ने तीनवेळा त्यांना समन्स बजावले होते. मात्र, २७ जुलैला ‘ईडी’ने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले असताना राऊत चौकशीला गैरहजर राहिले होते. त्यानंतर रविवारी ‘ईडी’चे पथक राऊत यांच्या घरी पोहोचले. राऊत यांच्या खोलीतील कागदपत्रे आणि दस्तावेज ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी तपासल़े  यावेळी साडेअकरा लाख रुपये ‘ईडी’ने जप्त केले. त्यानंतर याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी आपल्याला ‘ईडी’ कार्यालयात यावे लागेल, असे ‘ईडी’कडून राऊत यांना सांगण्यात आले. साडेनऊ तासांच्या ‘ईडी’च्या कारवाईनंतर सायंकाळी पाचच्या सुमारास राऊत यांना घेऊन ‘ईडी’ अधिकारी बेलार्ड पिअर येथील कार्यालयाकडे निघाले. निवासस्थानाबाहेर निघताना राऊत यांनी गाडीतून हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले. साडेपाचच्या सुमारास राऊत ‘ईडी’च्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात दाखल झाले. तेथे त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी राऊत यांचे भाऊ सुनील राऊत आणि वकील ‘ईडी’ कार्यालयाबाहेर उभे होते. रात्री उशीरापर्यंत ही चौकशी चालली होती.

नक्की वाचा >> संजय राऊत यांना ‘ईडी’कडून अटक; सपना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी वाकोला पोलीस स्थानकात FIR दाखल

सपना पाटकरला धमकावल्याप्रकरणी एफआयआर दाखल
“संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. भाजपा त्यांना घाबरत असल्याने त्यांना अटक करण्यात आलीय. त्यांनी आम्हाला यासंदर्भातील (अटकेसंदर्भातील) कागदपत्रं दिलेली नाहीत. त्यांना यात गोवण्यात आलेलं आहे,” असा आरोप राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. याचदरम्यान काल रात्री वाकोला पोलीस स्थानकामध्ये संजय राऊतांविरोधात कलम ५०४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत सपना पाटक यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना पाटकर या पत्रा चाळ प्रकरणातील साक्षीदार आहेत.

खोटे पुरावे तयार केल्याचा आरोप
‘ईडी’च्या कारवाईला घाबरणार नाही, त्यांच्या दबावापुढे झुकणार नाही आणि घाबरून शिवसेनाही सोडणार नाही, असा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला. ‘ईडी’ने माझ्याविरोधात खोटे पुरावे तयार करून कारस्थान रचून कारवाई केली आहे. ही कारवाई खोटी आहे, असेही राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संताप
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या घरी ‘ईडी’चे पाहुणे दाखल झाले. हे काय चालले आहे? हे सगळे कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चालले आहे की, लाज-लज्जा सोडून देशात दडपशाही सुरू आहे, असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपावर सोडले. या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, मराठी माणसाचा पराक्रम काय असतो, हे अन्याय करणाऱ्यांना दाखवून देऊ, असा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut home in bhandup enforcement directorate raid name of cm eknath shinde on cash recover scsg
First published on: 01-08-2022 at 08:58 IST