Sanjay Raut : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. या पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. अशातच काल शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेबाबत बोलताना, वाईटातून चांगलं घडायचं असेल, त्यामुळे हा पुतळा कोसळला असेल, अशा प्रकारचं विधान केलं आहे. यावरून विरोधकांना आता आक्रमक पावित्रा घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावरून टीकास्र सोडलं आहे.

संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दीपक केसरकार यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली. तसेच या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“या घटनेमुळे महाराष्ट्राच्या मनाला जखम झाली आहे. यासाठी निषेध हा शब्दही तोडका आहे. अशातच या माणसाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं. अशा लोकांना चपलेनं मारलं पाहिजे. ही मिंध्यांनी पोसलेली अफजलखानाची अवलाद आहे. अशी माणसं मिंध्यांच्या मंत्रिमंडळात आहे. ही घाण आमच्याकडून केली गेली, ते बरंच झालं”, असं संजय राऊत म्हणाले.

“ही सडक्या विचारांची माणसं आहेत. यावरून यांची घाणेरडी मनोवृत्तीची दिसून येते. अशा घाणेरड्या मनोवृत्तीची लोक देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केली आहे. हे देवेंद्र फडणवीस यांचंच पाप आहे. हे शिवाजी महाराजांचे शत्रू का झाले हेच कळत नाही. मिंधे आणि त्यांची टोळी पोसण्याचं काम फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या सगळ्यांनी मिळूनच पैसे खाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला”, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा – Statue Collapse : “शिंदेंनी मर्जीतल्या ठेकेदारांना कंत्राट दिलं”, पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “मोदी जिथे हात लावतात..”

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असा प्रकारे कोसळणं हा महाराष्ट्र झालेला आघात आहे. केवळ निषेध करून या विषयाची फाईल बंद करता येणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, हे आता उघड झालं आहे. प्रख्यात शिल्पकार रामपुरे यांनीही, हा पुतळा पडला असेल तर तो केवळ भ्रष्टाचारामुळे पडला”, असं म्हटलं आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केलं. “मुख्यमंत्री म्हणतात, की हा पुतळा वाऱ्यामुळे पडला, पण पुतळ्यांच्या शेजारी अनेक झाडंदेखील आहेत. वाऱ्यामुळे ती झाडंदेखील पडायला हवी होती. मात्र, तसं घडलं नाही. केवळ पुतळा पडला. याचा अर्थ या पुतळ्याच्या बाधकांमात भ्रष्टाचार झाला, हे सिद्ध होते. तसेच या भ्रष्टाचारचं ठाणे कनेक्शनदेखील पुढे आल्याचं वृत्त आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले होते?

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे. त्यामुळे नागरिकांनी या पद्धतीने याकडे बघावं, कदाचिक वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्यातून ही घटना घडली असेल, हा अपघात नेमका कसा घडला. याचा तपास सुरू आहे. यात जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई सुद्धा होईल. पण कारवाई केल्याने जखमी भरून येत नाही. जखमा भरून यायच्या असतील, तर अतिशय भव्य पुतळा याठिकाणी उभा करावा लागेल. महाराजांसाठी तीच खरी आदरांजली ठरेल”, असं दीपक केसरकर म्हणाले होते.