सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात जे बोंबलत आहेत त्यांना बोंबलू द्या! असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. दीड दमडीच्या भाजपाच्या बिहारमधल्या लोकांनी आमच्यावर शिंतोडे उडवले त्याला आम्ही किंमत देत नाही असंही संजय राऊत यांनी भाजपाला सुनावलं आहे. हिटलरकडे एक गोबेल्स होता, भारतात १० हजार गोबेल्स आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मी माझ्या लेखात जी भूमिका घेतली ती योग्य आहे. ते माझं कर्तव्य आहे. काही लोक सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एक अजेंडा घेऊन चालले आहेत. मुंबई पोलिसांची प्रतीमा या लोकांनी मलीन केली असाही आरोप संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार हे एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका मांडली.
पाटण्याच्या पोलीस अधीक्षकांना क्वारंटाइन करण्यात आलं यातून नकारात्मक संदेश गेला असं वाटतं का? त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी यातून नकारात्मक संदेश गेल्याचं मान्य केलं आहे. तसंच सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा उपयोग बिहार निवडणूक समोर ठेवून होतो आहे. देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यासाठी भाजपाचे प्रभारी केलं जातंय ही चांगली गोष्ट आहे. मात्र योगायोग नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सीबीआयने हातात घेतलेली खुनाची कोणती प्रकरणं सुटली? याचं उत्तर कुणी देऊ शकेल का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. बिहारमध्ये सात ते आठ हत्या झाल्या होत्या ही प्रकरणं सीबीआयकडे गेली होती. यातले आरोपी पकडले गेले आहेत का? या सगळ्याचं उत्तर नाही असंच आहे.
सीबीआयकडे प्रकरणं देऊन त्यांच्याकडून उकल होत नाही. सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस तपास करत आहेत, त्यात सीबीआयचा संबंध काय? असाही प्रश्न संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस काय घडलं ते शोधून काढतील याची मला खात्री वाटते असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.