शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर बोचरी टीका केली. “राणेंनी आतापर्यंत १० वेळा आपला पक्ष बदलला, आपली आई बदलली. त्यांच्यावर आम्ही काय बोलावं,” असं म्हणत राऊतांनी राणेवर हल्ला चढवला. तसेच राणेंसारख्या बेईमान लोकांना मंत्रीपद देणं ही भाजपाची सवय असल्याचाही आरोप केला. ते गुरुवारी (६ एप्रिल) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “नारायण राणेंचं नाव घ्यायलाही आम्हाला लाज वाटते. कोण आहेत हे लोक, यांनी १० वेळा पक्ष बदलले, आपल्या आईला बदललं. जो आपली आई बदलतो, त्यांच्यावर आम्ही काय बोलावं. ते मंत्री बनले आहेत. बेईमान लोकांना मंत्रीपद देणं भाजपाची सवय झाली आहे. यात काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, जोतिरादित्य शिंदे असो की एकनाथ शिंदे, नारायण राणे.”

“सर्वोच्च न्यायालयाने ईडी-सीबीआयविरोधातील आमची याचिका फेटाळली, कारण…”

“सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराची आमची याचिका तात्पुरती फेटाळली आहे. आम्हाला पुन्हा नवी याचिका घेऊन त्यांच्यासमोर जावं लागेल. आधीच्या याचिकेत काही कागदपत्रे आणि पुराव्यांची पुर्तता झालेली नाही. त्यांनी याचिका ऐकण्यास नकार दिला. त्यावर भाजपाचे लोक अगदी बेंजो, कोंबडीबाजा लावून लाचायला लागले. यातून त्यांना किती आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत हे स्पष्ट होतं”, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“भाजपात दाखल होणाऱ्या नेत्यांवर ईडी-सीबीआयची कारवाई होत नाही”

संजय राऊत पुढे म्हणाले, “ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा राजकीय विरोधकांवर कारवाई करण्यासाठी गैरवापर होतो, अशी आमची भूमिका आहे. भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये टाकलेल्या लोकांवर कारवाई का होत नाही? जे तुमच्या पक्षात सहभागी झाले किंवा जे भविष्यात भाजपात दाखल होणार आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही.”

हेही वाचा : संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र, म्हणाले, “बाजार बुणगे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गृहमंत्री फडणवीसांचे उजवे हात असलेल्या नेत्याने ५०० कोटींचा घोटाळा केला”

“मी गेल्या १५ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे, ईडी-सीबीआयकडे या राज्यातील दोन प्रकरणं पाठवली आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात असलेल्या राहुल कूल यांनी शेतकऱ्यांचे ५०० कोटी रुपये बुडवून घोटाळा केला. हे सर्व ऑडिट रिपोर्ट आणि पुराव्यांसह देऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही,” असा आरोप संजय राऊतांनी केला.