शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास संस्थांच्या महाराष्ट्रातील कारवायांवरून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. “आम्ही जो त्रास भोगलाय त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कुणालाही माफ करत नाही,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे इंदिरा गांधी यांच्या काळातही पाहायला मिळालंय, असंही राऊतांनी यावेळी नमूद केलं.

संजय राऊत म्हणाले, “शरद पवार जे बोलत आहेत तो त्यांचा संताप, चीड आणि वेदना आहे. आमच्या मनात एक राग आहे. आम्ही महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार बनवलं ते याच चिडीतून निर्माण झालेलं आहे. सत्तेसाठी काहीही करायचं, केंद्रीय तपास संस्थांचा अमर्याद गैरवापर करायचा, महाराष्ट्रात केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग लोकशाही संकेतांना धरून नाही. शरद पवार यांनी सांगितलंय की तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे आपण इंदिरा गांधी यांच्या काळातही पाहिलंय.”

“तुम्ही पापी लोकं बुरखे घालून फिरता आणि आमच्यावर…”

“छगन भुजबळ यांना नंतर क्लिनचिट मिळाली. मग त्यांनी इतका काळ जो तुरुंगात घातला त्याचं काय? त्याची भरपाई कोण करणार? पवार कुटुंबीय, मी, अनिल देशमुख, छगन भुजबळ, अनिल परब, प्रताप सरनाईक असे फक्त आम्हीच तुम्हाला दिसतोय का? भाजपात किंवा त्यांच्या चमचामंडळात सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? आम्ही तुम्हाला घाबरत नाही, कारण आमचं काहीच पाप नाही. तुम्ही पापी लोकं बुरखे घालून फिरता आणि आमच्यावर आरोप करत चिखलफेक करता. याची किंमत भाजपाला चुकवावी लागेल. आम्ही जो त्रास भोगलाय त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कुणालाही माफ करत नाही,” असं म्हणत राऊतांनी भाजपाला इशारा दिला.

“आमच्यावर आरोप करायला लावून केंद्र सरकारने परमबीर सिंहांना पळवून लावलं”

संजय राऊत म्हणाले, “ज्या व्यक्तीने राज्याच्या गृहमंत्र्यांवर भन्नाट आरोप केले आज तो बेपत्ता आहे, त्याला फरार घोषित करावं लागलं. ती व्यक्ती कुठे आहे हे कुणाला माहिती नाही. हे सगळ्यात मोठं विडंबन आहे. जर ते पळून गेले असतील तर त्यात केंद्र सरकारचा हात आहे. केंद्राच्या मदतीशिवाय कुणीही हवाई, समुद्री किंवा रस्त्याच्या मार्गाने देशाच्या सीमा पार करू शकत नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करून त्यांना पळवून लावलंय.”

हेही वाचा : “मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला वाटतचं नाही की ते…”; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन राऊतांचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अनिल बोंडे यांनी देशात ज्या राज्यात भाजपाचं सरकार आहे तिथं कुणीही दंगली करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा हिंमत करत नाही, असा दावा केला. यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपा महाराष्ट्रात दंगली घडवण्याची हिंमत करत आहे, असं प्रत्युत्तर दिलं. सरकार पाहतंय. मी त्यावर बोलणार नाही. गृहमंत्रालय त्यावर पाहिल,” असंही राऊतांनी नमूद केलं.