मुंबई : सध्या जगभर ‘फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२’चे वारे वाहत असून जगभरातील फुटबॉलप्रेमी आपापल्या देशाच्या वा आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी कतारमध्ये दाखल झाले आहेत. दिवसेंदिवस स्पर्धेतील चुरस वाढत असून यंदा विश्वचषकावर कोणता देश आपले नाव कोरणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. त्याच वेळी ‘फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२’च्या व्यवस्थापनात खारूताईचा वाटा उचलणाऱ्या स्वयंसेवकांच्या लवाजम्यात स्थान मिळविणारा नवी मुंबईमधील सन्मय राजगुरू हा तरुण सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे व्यवस्थापन विनाअडथळा पार पडावे यासाठी कतारसह जगभरातील तब्बल २० हजार स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. हे समस्त स्वयंसेवक विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. या स्वयंसेवकांच्या फौजेत नवी मुंबई जवळील उलवे परिसरातील सन्मय राजगुरूचाही समावेश आहे. सन्मय कतारमधील दोहा येथील ‘एज्युकेशन सिटी स्टेडियम’मध्ये कार्यरत आहे. फिफाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याने स्वयंसेवकपदासाठी अर्ज केला होता. प्रत्यक्ष मुलाखत आणि आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सन्मयला स्वयंसेवक म्हणून निवड झाल्याचा ई-मेल आला आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.

हेही वाचा: विश्लेषण: गोलधडाका, विजयनृत्य आणि पेलेंना पाठिंबा… ब्राझीलने कशी जिंकली फुटबॉलरसिकांची मने?

गेले वर्षभर दोहा येथे कामानिमित्त असलेला सन्मय आणि अन्य स्वयंसेवकांना प्रत्यक्ष कामाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्याबाबतचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले आणि त्यानंतर सराव करून घेण्यात आला. सन्मयने माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील गणित विषयात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. रुईया महाविद्यालयात असताना त्याने फाईन आर्ट्सच्या चमूत स्वयंसेवक म्हणून काम केले असून तो एक उत्तम चित्रकार आहे.‘फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२’मध्ये स्वयंसेवकांचे विविध विभाग असून सन्मय मार्केटिंग विभागात ‘युवा कार्यक्रम स्वयंसेवक’ म्हणून सध्या कार्यरत आहे. फुटबॉल सामन्यापूर्वी संबंधित संघांच्या देशांचे राष्ट्रगीत होते. तत्पूर्वी लहान मुले खेळाडूंसोबत मैदानात येतात. या लहान मुलांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सन्मय आणि त्याच्या सहकारी स्वयंसेवकांवर आहे.

हेही वाचा: FIFA WC 2022: “मी घाबरलो होतो…” दुखापतीनंतर सावरलेल्या नेमारने शेअर केला वेदनादायी अनुभव

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा अनुभव आगळाच आहे. स्वयंसेवक म्हणून निरनिराळ्या देशांचे संघ आणि लहान मुलांसोबत काम करायला मिळत आहे. लहान मुले आमच्यासोबत मिळून मिसळून राहतात, स्वतःचा अनुभव सांगतात. यातून बरेच काही शिकायला मिळत आहे. विविध देशांची संस्कृती, शैली जाणून घेता येते, असे सन्मय राजगुरूने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: FIFA World Cup 2022: पोर्तुगालसमोर स्विर्त्झंलडचे आव्हान

पोर्तुगाल विरुद्ध दक्षिण कोरियाच्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात लिओनेल मेस्सी या प्रसिद्ध खेळाडूंचे दर्शन घडले. हे सामने पाहताना आलेला अनुभव थक्क करून गेला. सामना सुरू झाला आणि मैदानातील वातावरण भारावून गेले. काही चाहते आपल्या देशाचे झेंडे फडकवत, आवडत्या फुटबॉलपटूचा जयघोष करीत होते. मैदानात सामना सुरू झाला आणि खेळाडू कसब पणाला लावून खेळत होते. हा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभव विलक्षण होता. अन्य देशांच्या संघात होणारे सामनेही असेच लक्ष्यवेधी ठरत आहेत, असे अनुभव कथन करताना सन्मय म्हणाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanmay rajguru from navi mumbai is working as a volunteer in the fifa world cup mumbai print news tmb 01
First published on: 06-12-2022 at 17:53 IST