मुंबई : देशातील सर्वांत मोठी नागरी सहकारी बँक असलेली सारस्वत बँक न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा ताबा घेणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवार, १ जुलै रोजी केली जाईल. न्यू इंडिया सहकारी बँकेच्या हजारो संत्रस्त ठेवीदारांसाठी ही दिलासादायी घटना ठरेल. रिझर्व्ह बँकेने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचा (एनआयसीबी) घोटाळा उघडकीस आणला होता. गेली काही वर्षे सुरू असलेल्या या घोटाळ्यात १२२ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले असून, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्षांसाह अनेक उच्चपदस्थांविरोधात गुन्हा दाखल झाला.

एनआयसीबीच्या निधीतून विविध कंपन्यांच्या नावे कर्जासाठी रकमा काढून प्रत्यक्षात त्या स्वतःच्या बनावट कंपन्यांकडे वळत्या केल्याचे आढळून आले. सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या दोन तपासयंत्रणा या घोटाळ्यातील प्रकरणांची चौकशी करत आहेत. या घटनेनंतर रिझर्व्ह बँकेने एनआयसीबीचे बहुतेक व्यवहार १२ महिन्यांसाठी स्थगित केले आणि या बँकेवर प्रशासकही नेमला. तसेच तरलतेची नाजूक स्थिती लक्षात घेऊन ठेवीदारांवर त्यांच्या बचत वा चालू खात्यातून रक्कम काढण्यावर प्रतिबंध आले. ठेवींवरील विमा हमी म्हणून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा ठेवीदारांना देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा कालखंडात एनआयसीबीचा ताबा सारस्वत बँकेसारख्या मोठ्या, प्रतिष्ठित आणि सुरक्षित बँकेकडे जाणे हा संकटग्रस्त ठेवीदारांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. १०६ वर्षे जुन्या सारस्वत बँकेकडे ९३ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. आजवर नऊ बँकांचे यशस्वी अधिग्रहण सारस्वत बँकेने केले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये बुडीत वा कर्जाची कोणतीही नोंद झालेली नाही. आठ राज्यांमध्ये ३००हून अधिक शाखा, ३५०हून अधिक एटीम केंद्रे आहेत. ऑनलाइन खाते उघडण्यासाठी मोबाइल ॲपचा वापर सुलभ करणारी ही देशातली पहिलीच नागरी सहकारी बँक आहे.