मुंबई : विविध आजार व त्यासंबंधित उपचारांबद्दल मनोरंजनात्मक पद्धतीने माहिती देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजीत रामदास पाध्ये यांनी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयासाठी व्हीके म्हणजेच ‘विचारकर’ या पुणेरी शैलीतील बोलक्या बाहुल्याची निर्मिती केली आहे. भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रात पहिल्यांदाच हा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. ‘विचारकर’ बाहुला भारतातील पहिला हेल्थकेअर मॅस्कॉट ठरला आहे.
व्हीके म्हणजेच ‘विचारकर’ हा पुणेरी शैलीतील बोलका बाहुला सह्याद्री रुग्णालयाचे ब्रॅण्ड अँबॅसिडर सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर (एके) यांच्यासोबत ‘द एकेव्हीके शो’ या खास कार्यक्रमातून विविध विषयांवर चर्चा करतो आणि माहितीही देतो. सत्यजित पाध्ये आणि त्यांच्या चमूतील कौस्तुभ माळकर व कैलाश टिके यांनी ‘द एकेव्हीके शो’च्या एकूण ८ चित्रफितींचे चित्रीकरण केले आहे. त्यातून सह्याद्री रुग्णालयातील विविध सोयीसुविधा आणि इतर गोष्टींबाबत माहिती देण्यात आली आहे.
एके आणि व्हीके यांच्यातील धमाल गप्पांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला आवडत असून याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. दहा डॉक्टरांसह विशेष ‘पॉडकास्ट’ चित्रफितींचे चित्रीकरण करण्यात आले आहे. डॉक्टरांसोबतच्या पॉडकास्टमध्ये ‘विचारकर’ बाहुला डॉक्टरांना विविध आजारांबद्दल आणि त्यासंदर्भातील उपचारांबद्दल प्रश्न विचारून चर्चा करतो. या ‘पॉडकास्ट’मधील ‘विचारकर’ बोलक्या बाहुल्याची संपूर्ण संहिता व प्रश्न हे तज्ज्ञ डॉक्टर मंडळींनी लिहून दिलेले आहेत. तर या प्रयोगाबद्दल ‘पॉडकास्ट’मध्ये सहभागी होणाऱ्या डॉक्टरांनाही पूर्वकल्पना दिली जाते.

या सर्व हिंदी भाषेतील चित्रफिती असून ‘Sahyadri Hospitals’ या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत. ‘विविध आजार आणि त्यासंबंधित उपचारांबद्दलची चर्चा ही नेहमी गंभीर स्वरूपातील असते. त्यामुळे विविध आजारांबद्दलची लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि त्यांना मनोरंजनात्मक पद्धतीने उपचारांबद्दल माहिती मिळावी, या उद्देशाने सह्याद्री रुग्णालयाने आरोग्यसेवा क्षेत्रातील विविध गोष्टींसंदर्भात माहिती देणाऱ्या बोलक्या बाहुल्याची संकल्पना मांडली.
तसेच हा बाहुला नेमका कसा असेल याचे रेखाचित्रही त्यांच्याकडून देण्यात आले. त्यानंतर सर्व गोष्टींचा अभ्यास करून व्हीके म्हणजेच ‘विचारकर’ या पुणेरी शैलीतील बोलक्या बाहुल्याची जवळपास पंधरा ते वीस दिवसात निर्मिती केली. हा पुणेरी बाहुला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या संहितेनुसार माहिती देतो, तसेच पॉडकास्टच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवादही साधतो’, असे सत्यजित रामदास पाध्ये यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.