मुंबई : बदलत गेलेला स्त्रीत्वाचा विचार समाजमनाचा आरसा म्हणून ओळखल्या गेलेल्या मराठी नाटकांमधूनही सातत्याने उमटत राहिला. १९८९ साली रंगभूमीवर आलेल्या ‘व्हय मी सावित्रीबाई’ ते ‘संगीत देवबाभळी’ या नाटकापर्यंत स्त्रीत्वाच्या बदलत गेलेल्या जाणिवांचा प्रवास ‘‘ती’ची भूमिका’ या खास रंगमंचीय आविष्कारातून गुरुवारी उभा राहिला.

स्त्रीत्वाच्या समाजमनात रुजलेल्या तथाकथित संकल्पना मोडीत काढून झालेला हा बदल विविध काळातील नाटकांमधील स्त्रीपात्रांच्या माध्यमातून उलगडणारा ‘ती’ची भूमिका हा ‘लोकसत्ता’ आयोजित विशेष कार्यक्रम गुरुवारी प्रभादेवीतील रवींद्र नाटय़मंदिर येथे सादर झाला. करोनासंदर्भातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षांनी मोकळय़ा वातावरणात रंगलेला हा नाटय़ानुभव घेण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. प्रातिनिधिक नाटकांचे उत्कट सादरीकरण यावेळी करण्यात आले.  मार्च महिना हा महिला दिनासाठी म्हणून ओळखला जातो. एरव्ही महिला दिनाच्या निमित्ताने नुसतेच छान, छान कार्यक्रम सादर करण्यापेक्षा गेल्या दीड शतकात खरोखरच स्त्रियांचे विचार कसे बदलत गेले, स्वत:त बदल घडवत आजची सक्षम स्त्री कशी उभी राहिली हे अनुभवायला हवे. त्यावर विचार करत सकारात्मकतेने या बदलात आपण सामील व्हायला हवे, या धारणेतून ‘‘ती’ची भूमिका’ हा कार्यक्रम साकारला आहे, असे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविकातून विशद केले. रंगभूमी हा समाजाचा आरसा आहे आणि या रंगभूमीने पुरुष नाटककारांनी तिच्यासाठी लिहिलेली भूमिका, संहिता ते स्त्रियांनी लिहिलेली तिची संहिता, तिचे नाटय़ विचार हा बदल पाहिला आहे. हा खूप मोठा आणि लक्षात घेण्याजोगा बदल आहे, असेही कुबेर यांनी यावेळी स्पष्ट केले.

नाटकातून बदलत गेलेल्या स्त्री प्रतिमा, त्या काळातील सामाजिक – आर्थिक बदलांचे समाजावर झालेले परिणाम आणि त्यातून जन्माला आलेली नाटके हा प्रवास ओघवत्या शब्दांतून रसिकांसमोर मांडण्याचे काम अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाची संहिता अभिनेत्री, लेखिका मुग्धा गोडबोले यांनी लिहिली होती. कार्यक्रमाचे संयोजन उत्तरा मोने यांनी केले. लोकसत्ता चतुरंग पुरवणीच्या संपादिका आरती कदम यांनी कलाकारांचे, उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ‘धूतपापेश्वर’चे रोहन कांबळे, ‘एनकेजीएसबी’च्या हिमांगी नाडकर्णी, ‘लोकसत्ता’चे केविन सिंटॉस, केदार वाळिंबे आणि प्रकाशिका वैदेही ठकार यांच्या हस्ते सर्व कलावंतांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

* या नाटय़ानुभवाची सुरुवात प्राचार्य सुषमा देशपांडे लिखित व्हय मी सावित्रीबाई या नाटकातील प्रवेशाने झाली. शुभांगी भुजबळ आणि शिल्पा साने यांनी हा प्रवेश सादर केला. त्यानंतर हिमालयाची सावली’ या वसंत कानेटकर यांच्या नाटकातील प्रवेश अभिनेत्री श्रुजा प्रभुदेसाई यांनी सादर केला.

’विजय तेंडुलकर यांच्या शांतता कोर्ट चालू आहे या नाटकातील बेणारेबाई अभिनेत्री लेखिका विभावरी देशपांडे यांनी साकारल्या, तर किमयागार या नाटकातील हेलन केलर आणि त्यांच्या शिक्षिका अ‍ॅन सुलेवान यांच्यातील घट्ट नात्याच्या गोष्टीची एक झलक संपदा कुलकर्णी, पल्लवी वाघ आणि राधा धारणे यांनी सादर केली.

* या चार प्रवेशानंतर सादर झालेले नाटय़प्रवेश हे तुलनेने नंतरच्या आधुनिकीकरणाच्या काळातील नाटकांमधील होते. प्रशांत दळवी यांच्या चारचौघी या नाटकातील स्वत:चे निर्णय स्वत: घेणाऱ्या नायिकेचा प्रवेश प्रतीक्षा लोणकर यांनी सादर केला.

* मिस्टर अँड मिसेस या नाटकातील मधुरा वेलणकर आणि आशीष कुलकर्णी यांनी सादर केलेला प्रवेश, अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे यांनी सादर केलेला प्रपोजल नाटकातील प्रवेश अशा उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या नाटय़ानुभवाची सांगता संगीत देवबाभळी या अगदी अलीकडच्या नाटकाने झाली. आवली आणि रुक्मिणी यांच्यातील हा हृद्य संवाद शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांनी रंगवला.

मुख्य प्रायोजक  

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहप्रायोजक  झी मराठी, श्री. धूतपापेश्वर लिमिटेड, एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लि., दोस्ती ग्रुप