मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने लांबणीवर पडलेले क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अखेर गुरुवारी जाहीर करण्यात आले. राज्य सरकारने यंदा १०९ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली असून दोन शिक्षकांना विशेष बाब म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा २२ सप्टेंबर रोजी होणार आहे.

राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. त्यानुसार १ सप्टेंबरपूर्वी पुरस्कार जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र यंदा मुख्यमंत्री कार्यालयाने वेळ न दिल्याने हे पुरस्कार पुढे ढकलण्यात आले होते.

अखेर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने गुरुवारी या पुरस्कारांची घोषणा केली. सात प्रवर्गांमध्ये १०९ शिक्षकांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. त्याशिवाय काही प्रवर्गांमध्ये शिक्षकांना पुरस्कारप्राप्त शिक्षकांएवढेच गुण मिळालेले असतात. पण त्या प्रवर्गांमध्ये पुरस्कार्थींची संख्या निश्चित असल्याने त्यांचे नाव जाहीर होत नाही. पण या शिक्षकांची उमेद वाढवण्यासाठी यंदापासून अशा दोन शिक्षकांना राज्य शिक्षक विशेष गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, आदिवासी क्षेत्रात काम करणारे शिक्षक, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका, विशेष शिक्षक (कला/क्रीडा), दिव्यांग शिक्षक, आणि स्काऊट-गाईड या सात प्रवर्गांमध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

प्रवर्गनिहाय पुरस्कार्थी शिक्षकांची आकडेवारी

प्रवर्ग—–शिक्षक

  • प्राथमिक—-३८
  • माध्यमिक—-३९
  • आदिवासी क्षेत्र—१९
  • आदर्श शिक्षिका—-८
  • विशेष शिक्षक कला/क्रीडा—-२
  • दिव्यांग शिक्षक—-१
  • स्काऊट-गाईड—-२
  • एकूण—-१०९