मुंबई : अंधेरी येथील मरोळ परिसरातील मासळी बाजारालगतच्या सावित्रीबाई फुले उद्यानात गेल्या काही दिवसांपासून रात्री गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे उद्यानात अस्वच्छता होत आहे. सकाळी व्यायाम करण्याचे ठिकाण आता मद्यपिंचे अड्डे बनल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. रात्री उद्यानात सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी वॉचडॉग फाऊंडेशनने महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
नागरिकांना सुदृढ आरोग्यासाठी दररोज प्रसन्न वातावरणात व्यायाम करता यावा, यासाठी महानगरपालिकेतर्फे मरोळ भागात सावित्रीबाई फुले महानगरपालिका उद्यान सुरू करण्यात आले आहे. मात्र, अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी गर्दुल्यांचा वावर वाढण्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी उद्यानात मद्यपी पार्ट्या करतात. तसेच, उद्यानात अस्वच्छताही होते. परिणामी, सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना उद्यान वापरणे अवघड होते. पायवाटांवर आणि जॉगिंग ट्रॅकवर कचरा, फुटलेल्या काचा, शिळे अन्न आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या पडल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि उद्यानातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्यानात मद्यपान करण्याचे प्रकार सातत्याने वाढू लागले आहेत. त्यामुळे उद्यानात रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत सुरक्षा रक्षक नेमावा, उद्यानात अधिक प्रकाशयोजना करावी, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
हे उद्यान महापालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयाच्या हद्दीत असून या समस्येबाबत वॉचडॉग फाउंडेशनने महानगरपालिकेला ई-मेलद्वारे पत्र पाठविले आहे. तसेच, स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस चौकीशी समन्वय साधून ‘सार्वजनिक उद्यानाच्या वापरासंबंधित नियमांची अंमलबजावणी करण्याचीही मागणी फाउंडेशनने केली आहे.
रोज सकाळी आम्ही त्या उद्यानात चालायला जातो, पण आता कचरा आणि फुटलेल्या काचेमुळे घसरून पडायची भीती वाटते. काही वेळा रात्रीच्या पार्टीनंतर उद्यानात काचेच्या बाटल्या आणि सिगारेटचे तुकडे पडलेले दिसतात. त्यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवायला हवे, असे मत स्थानिक रहिवासी शंकर यादव यांनी व्यक्त केले.
