मुंबई : प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणाऱ्या मुलांना पाठदुखीचा त्रास, सांधे आखडणे, स्नायू आखडणे, मणक्याची झीज, मान दुखणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण, डोकेदुखी यासारखे आजार होऊ शकतात. पाठीवरचे दप्तर योग्यरित्या न घातल्यास तसेच दप्तरातील वह्या-पुस्तकं तसेच इतर वस्तूंच्या ओझ्यामुळे ६ ते १६ वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये पाठदुखीची समस्या आढळून येते.

पाठदुखीच्या वाढत्या घटना मुलांमध्ये चिंतेचा विषय ठरत आहेत कारण मणक्यावर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे त्यांच्या दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांमध्ये आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. भविष्यात मान, पाठीचा कणा इत्यादी व्याधी विद्यार्थ्यांमध्ये बळावू शकतात. दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची उंची वाढण्यास अडथळे निर्माण होत आहेत. वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची उभे राहण्याची पद्धतच बदलली आहे. किंबहुना या वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक ठेवण बदलत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. पालकांनी हे लक्षात घ्या की आपल्या पाल्याच्या दप्तराचे ओझे हे शरीराच्या वजनाच्या १५ टक्के पेक्षा जास्त नसावे. मुलांना दुहेरी पट्ट्या असलेली बॅग वापरण्यास द्यावी आणि पाठदुखी टाळण्यासाठी दोन्ही खांद्यावर वजन समान रीतीने रहाण्यासाठी दोन्ही पट्ट्यांचा वापर योग्य पद्धतीने करणे गरजेचे असल्याचे ठाणे जिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ अस्थिशल्यविशारद डॉ विलास साळवे यांनी सांगितले.

हेही वाचा – धारावी पुनर्विकास प्रकल्प : पोटमाळ्यावरील घरांच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली डीआरपीपीएलकडून आमिष

पाठदुखी ही आता केवळ प्रौढांमधील समस्या राहिलेली नसून शाळेत जाणाऱ्या मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येते. जड बॅकपॅक मुलाच्या पाठीचा कणा, मस्क्यूकोस्केलेटल सिस्टम आणि शारीरीक ठेवण यावर परिणाम करते. त्यामुळे, पाठीचा कणा उलट्या विरुद्ध दिशेस झुकतो. शाळेत जाणाऱ्या १० पैकी ८ मुलांना पाठदुखीचा त्रास उद्भवतो. मुंग्या येणे, हात सुन्न होणे, लाल चट्टे येणे तसेच जड पिशव्यांमुळे शारीरीक स्थितीवर परिणाम होतो ज्यामुळे दैनंदिन कामात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे मुलं त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. जड पिशव्यांमुळे खांदे पाठीच्या वरच्या भागात वक्र होतात ज्यामुळे खांदा आणि मानेच्या वेदना वाढतात. मुलांची बॅग ही पाठदुखी होण्याइतकी जड नसावी, याची पालकांनी खात्री करावी असे लीलावती रुग्णालयाचे अस्थिशल्यविशारद डॉ समीर रुपारेल यांनी सांगितले.

इयत्ता पहिली व दुसरीमधील मुलांच्या बॅगेचे आदर्श वजन सुमारे एक किलो असावे, तर इयत्ता तिसरी ते पाचवीमधील मुलांचे वजन अडीच किलो दरम्यान असावे. इयत्ता सहावी ते आठवीमधील मुलांसाठी बॅगेचे वजन हे चार किलोच्या दरम्यान असावे, आणि इयत्ता नववी व दहावीमधील मुलांसाठी, दप्तराचे वजन हे सुमारे पाच किलो इतके असावे. पाठीवरील बॅग कंबरेखाली लटकू नये. जर बॅग खाली लटकत असेल तर ते जड आहे असे समजावे. पाठदुखी टाळण्यासाठी मुलांनी दप्तराच्या दोन्ही पट्ट्या खांद्यावर घालाव्यात. एका खांद्यावर दप्तर घेतल्यास असमान वजन भरून काढण्यासाठी शरीर एका बाजूला झुकते परिणामी पाठीचा कणा वाकू होऊ शकतो. यामुळे काहींना स्कोलियोसिसचा त्रास होऊ शकतो असेही डॉ विलास साळवे म्हणाले.

हेही वाचा – मुंबई : चेंबूरमधील शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

नवी मुंबईतील खारघर येथील स्पाइन सर्जन डॉ बुरहान सलीम सियामवाला म्हणाले की, लहान मुलांमध्ये पाठदुखीचे प्रमाण वाढले आहे. पाठदुखी टाळण्यासाठी मुलांच्या दप्तराचे ओझे वाढणार नाही याची काळजी पालकांनी घेणे आवश्यक आहे. पाठदुखीचा संबंध प्रौढांशी असला तरी ही समस्या आता लहान मुलांमध्येही दिसून येते. पाठीवर दप्तर घेऊन जाताना तसेच वर्गात किंवा घरी बसण्याची अयोग्य शारीरीक स्थिती हे देखील पाठदुखीस कारणीभूत ठरते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लहान मुलांच्या पाठीवर जितके वजन कमी असेल तितके चांगले. याशिवाय मुलांच्या आहारात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असावे. मुलांच्या आहाराबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर मुलांना पाठदुखीचा त्रास होत असेल तर त्यांच्या पाठीवर किंवा शाळेत बसण्याच्या स्थितीकडे विशेष लक्ष द्या. योग्य जीवनशैलीचे पालन करणे आणि शारीरिक हालचालींना प्रोत्साहन दिल्याने या वेदना प्रभावीपणे दूर होऊ शकतात.