लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची दुसरी प्रवेश यादी सोमवार, ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आली. मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) हे दुसऱ्या फेरीतही नव्वदपार आहेत. १ लाख ७६ हजार ४९३ जागांसाठी दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत एकूण १ लाख ६१ हजार ७२० विद्यार्थी पात्र होते. त्यातील ७५ हजार ८९६ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. यापैकी १८ हजार ७०२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, १४ हजार १७७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि १० हजार ९५० विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.

विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन कोणते कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले की नाही, हे पाहता येईल. सदर दुसऱ्या प्रवेश यादीतील पात्र विद्यार्थ्यांना ३ जुलै (सकाळी १० पासून) ते ५ जुलै (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास सहमती असल्यास विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘प्रोसिड फॉर एडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करून घ्यावा. विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झाले असल्यास त्यांना प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल.

आणखी वाचा-VIDEO: “अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादीबरोबर…”, फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय मिळाले असेल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास वेळापत्रकात नमूद केलेल्या कालावधीत आपला ऑनलाइन प्रवेश निश्चित करून घ्यावा, अन्यथा पुढील प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.