मुंबईः अंधेरी एमआयडीसी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुकतीच गुन्हे शाखेने कारवाई केली होती, त्यावेळी ४० बारबाला नाचताना आढळल्या होत्या. बार प्रशासनाने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले होते. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन अंधेरी एमआयडीसी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

एमआयडीसी परिसरातील बारवर गुन्हे शाखेने छापा टाकला होता. त्यावेळी तेथे ४० बारबाला नाचताना आढळल्या. तसेच इतर अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचेही आढळले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिसरातील बारमध्ये नियमांतर्गत काम सुरू असल्याची तपासणी करण्याची जबाबदारी असलेले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांच्याविरोधात ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) परमजीत सिंह दहिया यांना याबाबतच विचारणा केली असता त्यांनी त्यास दुजोरा दिला. या परिसरातील परवानाधारी आस्थापनांमध्ये नियमांचे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस ठाण्याची असते. त्यात कसूर झाल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली.

विभागीय चौकशीचे आदेश

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बारवर गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्ष व कक्ष-२ च्या पोलिसांनी संयुक्त कारवाई केली होती.त्यावेळी मोठ्या प्रमाणात नियमभंग झाल्याचे आढळून आले होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे गैरप्रकार होणार नाहीत, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर होती. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच कारणे दाखवा नोटीसही जारी करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर पोलिसांनाही संदेश

या बारमध्ये एक दोन नाही, तर ४० बारबाला अश्लील नृत्य करताना आढळल्या होत्या. यावरून संबंधित बार मालकाला कायद्याची भीती नव्हती. त्यामुळे त्याने सर्रास नियमभंग केला. या कारवाईद्वारे सर्व पोलीस अधिकाऱ्यांना एक संदेश देण्यात आला असून इतर ठिकाणी असे गैरप्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी हद्दीतील बारवर कारवाई झाल्यानंतर संबंधित पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात येत होती. पण आता थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याद्वारे इतर पोलिसांनाही संदेश देण्यात आला आहे.