मुंबई : दैनंदिन जीवनातील अनेकविध विषय, खासकरून ज्येष्ठ नागरिकांचे विषय आणि विनोदी लेखनासाठी प्रसिध्द असलेले ज्येष्ठ लेखक भा. ल. महाबळ यांचे बुधवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी मुलुंड येथील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हाडाचे शिक्षक असलेल्या भा. ल. महाबळ यांनी आयुष्याच्या सांजपर्वात अधिकतर लेखन केले. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांनी साहित्य लेखनाला सुरुवात केली होती. १९४९ ते १९५८ दरम्यान सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून त्यांनी बी. एस्सी. (ऑनर्स) आणि वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (स्थापत्य अभियांत्रिकी) हे पदवी शिक्षण पूर्ण केले. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी अमृत, आलमगीर, किर्लोस्कर – स्त्री – मनोहर, तारका, रंजन, वाङ् मयशोभा, हंस – मोहिनी – नवल आदी अनेक नियतकालिकांमधून लेखन केले होते. ते १९६२ मध्ये मुंबईत ‘व्हीजेटीआय’ या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि त्यांचा लेखन प्रवास थांबला. वयाच्या साठाव्या वर्षी १९९० मध्ये ते व्हीजेटीआयमधून निवृत्त झाले. त्यानंतर मात्र दीर्घकाळ मनात साठवलेल्या लेखनाची आंतरिक उर्मी त्यांना स्वस्थ बसू देईना.

हेही वाचा >>>गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार; नरेंद्र मोदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांचे १९९१ साली ‘अस्सा नवरा’ हे पहिले पुस्तक उदवेली बुक्स प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झाले. त्यांचे ‘आजोबांच्या चष्म्यातून’ हे पंचविसावे पुस्तक याच प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले होते. याशिवाय, ‘ज्येष्ठांसाठी ४ गोष्टी युक्तीच्या’, ‘हास्यतुषार’, ‘हसरे किस्से’, ‘हास्यविनोद’, ‘विसावा’, ‘चोरा मी वंदिले’, ‘संसाराचं गणित’ अशा अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. त्यांचे विविध विषयांवरील लेख, लेखमाला, कथा, कविता वृत्तपत्रातून प्रसिध्द होत असत. दै. ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ आणि ‘लोकरंग’ या पुरवणीत त्यांनी विविध विषयांवर लेखन केले होते. त्यांच्या पुस्तकांना अनेक महत्त्वाचे पुरस्कारही प्राप्त झाले होते. छोट्या विनोदी चुटकुल्यांचे लेखन हेही त्यांचे वैशिष्ठ्य होते.