मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात सुरू केलेल्या उपोषणाचा आज (१३ सप्टेंबर) १६ दिवस आहे. मात्र, अद्यापही मराठा आरक्षणावर आंदोलकांचे समाधान करेल असा तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणावर बोलताना शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर गंभीर आरोप केले. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “या सरकारला मराठा आरक्षणावर काहीच करायचं नाही. हे सरकार घाबरट आहे. हे सरकार केवळ आश्वासन देतं. या सरकारला मनोज जरांगे पाटील यांना मारायचं आहे, संपवायचं आहे. त्यांना काहीही काळजी नाही.”

“मग आता ते आश्वासनांचे फुलबाजे विझले का?”

“आमच्या हातात सत्ता आली की, २४ तासात मराठ्यांना आरक्षण देऊ हे सांगणारे आज आरक्षण का देत नाहीत. त्यामुळे जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे. यांच्यावर विश्वास कोण ठेवेल. माझ्या हातात सत्ता द्या, सरकार आल्यावर २४ तासात पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणार होते. हे यांनीच उडवलेले फुलबाजे आहेत, मग आता ते आश्वासनांचे फुलबाजे विझले का?” असा प्रश्नही संजय राऊतांनी विचारला.

उद्धव ठाकरेंवर केलेल्या शिंदेंच्या आरोपाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंच्या लंडनमधील घर आणि संपत्तीबाबत गंभीर आरोप केले होते. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “मला याविषयी माहिती नाही, पण उद्धव ठाकरेंच्या लंडनमधील कथित घराच्या चाव्या अजय अश्रफ नावाच्या बिल्डरकडे असतील. अशाप्रकारे बोलल्याने त्यांच्यावरील ५० खोक्यांचे आरोप धुतले जाणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं.”

हेही वाचा : “मराठा आरक्षण हाच माझ्यावरचा उपचार”; मनोज जरांगेंनी सर्वपक्षीय नेत्यांना ठणकावलं, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कुणाची कमाई कोणत्या बिल्डरच्या माध्यमातून कोणत्या देशात जाते हे सर्वांना माहिती”

“या मुंबईसह ठाण्यात सध्या बिल्डरांचं राज्य सुरू आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. यातून केलेली कमाई कोणत्या देशात जाते आणि कोणत्या बिल्डरच्या माध्यमातून जाते हेही सर्वांना माहिती आहे. आम्हाला बदनाम करून एकनाथ शिंदेंवरील डाग धुतले जाणार नाहीत,” असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं.