मुंबई : स्त्री ही चुकीच्या समजुतींवर लैंगिंक किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करत नाही. किंबहुना, एखादी स्त्री अशा कृतीचा परिणाम पूर्णपणे समजून घेतल्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा तर्कसंगत निर्णय घेते, त्यामुळे तिची संमती ही चुकीच्या समजुतींवर आधारित असल्याचे मानले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवले. तसेच, एका अनिवासी भारतीय शास्त्रज्ञाची बलात्काराच्या आरोपांतून निर्दोष सुटका केली.

तथापि, लग्नाचे खोटे वचन दिल्याचे स्पष्ट पुरावे असल्यास परिस्थिती वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता येईल, असेही अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर मोरे यांनी उपरोक्त निकाल देताना प्रामुख्याने नमूद केले.

मूळ गुजरातमधील असलेल्या, परंतु युरोपमध्ये काम करणाऱ्या अनिवासी भारतीय शास्त्रज्ञावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप ठाण्यातील २७ वर्षांच्या तरूणीने केला होता. तिच्या तक्रारीच्या आधारे या शास्त्रज्ञाविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

सरकारी पक्षाच्या आरोपांनुसार, पतीपासून विभक्त झालेल्या तक्रारदार तरुणीला सप्टेंबर २०१९ मध्ये एका विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावर आरोपीबाबत माहिती मिळाली. आरोपी आणि तक्रारदार तरुणीला संकेतस्थळावरील उपलब्ध करण्यात आलेली एकमेकांबाबतची माहिती आवडली. त्यानंतर दोघांनी फोनवर बोलणे आणि संदेशांची देवाणघेवाण करण्यास सुरुवात केली.

पुढे, ३१ डिसेंबर २०१९ रोजी दोघेही नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मुंबईत भेटले. त्यावेळी ‘मी तुला आवडते का ?’ या तक्रारदार तरुणीच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोपीने तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, दोघेही अंधेरी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले. तेथे आरोपीने तक्रारदार महिलेला पेय प्यायला दिले व नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तक्रारदार तरुणीने केला होता. दोघेही हॉटेलमध्ये राहिले आणि नवीन वर्षाच्या पार्टीसाठी एकत्रितपणे एका क्लबमध्ये गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी हॉटेल सो़डले. तथापि, आरोपीने त्यानंतर तक्रारदार तरुणीला टाळण्यास सुरुवात केली आणि त्याच्या पालकांनी नकार दिल्याने आणि ती आधीच विवाहित असल्याचा दावा करून तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तक्रारदार तरुणीने पोलिसांत आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली. खटल्यादरम्यान, आपण विवाहित असल्याचे विवाहासंबंधीच्या संकेतस्थळावर नमूद केले नव्हते, अशी कबुली तक्रारदार तरुणीने न्यायालयात दिली, परंतु फोनवरून बोलणे सुरू झाल्यानंतर आपण घटस्फोटित असल्याचे आरोपीला सांगितल्याचा दावाही तिने केला.

आरोपीचा दावा

आरोपीने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले. तसेच, लग्नासाठी त्याने तक्रारदार तरुणीकडे वेळ मागितला होता. परंतु, तिने आपल्याला बलात्काराची खोटी तक्रार दाखल करू असे धमकावण्यास सुरूवात केल्याचा दावा आरोपीने केला. तसेच, तक्रारदार महिलेने पहिल्या लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारल्याचा आणि तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला नसल्याचा दावाही आरोपीने केला. त्याचप्रमाणे आमच्यात परस्पर संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे आणि ते कोणत्याही गैरसमजुतीतून केलेले नसल्याचे सिद्ध करणारे व्हॉट्सॲप संदेशही आरोपीने न्यायालयात पुरावे म्हणून सादर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाचे म्हणणे..

आरोपीने लग्न करण्याचे वचन दिले होते, असे तक्रारदार तरूणीने म्हटले होते. त्यातून आरोपीने तिच्याशी लग्नास स्पष्ट नकार दिला नसल्याचे सिद्ध होते. किंबहुना, तक्रारदार तरुणीच्या पार्श्वभूमीमुळे तिच्याशी लग्न करण्यासाठी तो त्याच्या पालकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होता, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. तसेच, दोघांमध्ये परस्पर संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याचे पुराव्यातून स्पष्ट होते, असे नोंदवून आणि सगळ्या बाजूंनी प्रकरण तपासून पाहिल्यानंतर आरोपीची त्याच्यावरील बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटका करत असल्याचे न्यायालयाने म्हटले.