मुंबई : आशिया खंडातील मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात आतापर्यंत अनेक गरीब रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. हे १५०० खाटांचे रुग्णालय खासगी उद्योगपतीला चालविण्यास देण्याचा विचार मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. या रुग्णालयाचे खासगीकरण झाल्यावर त्याचे पंचतारांकित रुग्णालयामध्ये रुपांतर होऊन सर्वसामान्य रुग्णांना तेथे उपचार मिळणे अशक्य होणार आहे. त्यामुळे अंधेरी विकास समितीने महानगरपालिकेच्या या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत रुग्णालयाच्या खासगीरकरणाविरोधात गुरुवारी मोर्चा काढला होता.
अंधेरी, जोगेश्वरी, मालाड या भागातील सर्वसामान्य गरीब नागरिकांच्या दृष्टीने सेव्हन हिल्स रुग्णालय महत्त्वाचे मानले जाते. मुंबई महानगरपालिकेतर्फे २०१० मध्ये हे रुग्णालय उभारण्यात आले. आंध्र प्रदेशमधील खाजगी उद्योगपतीमार्फत ते चालविण्यात येत होते. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी २० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र रुग्णालयासंदर्भात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यातच आता मुंबई महानगरपालिका हे रुग्णालय मुंबईतील एका खासगी उद्योगपतीला विकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अंधेरीतील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी गुरूवारी अंधेरीमधील नागरिकांनी अंधेरी विकास समितीच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढला होता.
सेवन हिल्स रुग्णालयामध्ये साधारण १५०० खाटा, ३६ विविध शस्त्रक्रियागृह विभाग, १२० खाटांचे अतिदक्षता विभाग, कर्मचारी वसाहत असे जवळपास १७ एकरवर हे अद्ययावत रुग्णालय उभे आहे. हे रुग्णालय खासगी उद्योगपतीकडे गेल्यानंतर त्याचे पंचतारांकित रुग्णालयामध्ये रुपांतर होऊन सर्वसामान्य नागरिकांना तेथे उपचार मिळणे अशक्य होईल, असे अंधेरी विकास समितीचे कार्याध्यक्ष दिलीप माने यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई उपनगरचे पालकमंत्री, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिल्याचेही त्यांनी सांगितले.
सेव्हन हिल्स रुग्णालय खासगी उद्योजकाला साधारणपणे ३०० ते ४०० कोटी रुपये किमंतीला विकले जाण्याची शक्यता आहे. मात्र ७० हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगरपालिकेला हे रुग्णालय चालवण्यास कसलीच अडचण नाही. रुग्णालय चालविण्यासाठी महिना साधारण ५० कोटी खर्च अपेक्षित आहे. मुंबईतील जे.जे. रुग्णालय, केईएम रुग्णालय व शीव रुग्णालयाच्या धर्तीवर हे रुग्णालय चालविण्याबरोबरच येथे वैद्यकीय व परिचारिका अभ्यासक्रम सुरू केल्यास गरीब रुग्णांबरोबरच विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होईल. करोना काळात या रुग्णालयाने उल्लेखनीय काम केले होते. मुंबई महानगरपालिकेनेच हे रुग्णालय चालवाने, असे अंधेरी विकास समितीचे अध्यक्ष राजेश शर्मा यांनी सांगितले.
समितीचे पदाधिकारी दिनकर तावडे, माजी नगरसेवक प्रमोद सावंत, माजी नगरसेवक क्लाईव्ह डायस, अखिलेश सिंह यावेळी उपस्थित होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी दोन – तीन दिवसातच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी यावेळी दिले.
