मुंबई : यशाला शॉर्टकट नसतो, परंतु जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल, तर अवकाशातही भरारी घेता येते या शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या शहापूर तालुक्यातील शिरगाव येथील सुजाता मडके हिचे अभिनंदन केले. सुजाता ही मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.

ठाणे शहरातील मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता मडके यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाने केवळ ठाणे जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण परिवहन विभागाचा गौरव वाढवला आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

मंत्री सरनाईक म्हणाले की, साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुजाता यांनी आपल्या शिक्षणात सातत्य राखत, आयुष्यभर कष्ट आणि चिकाटीचा आदर्श घालून दिला. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अविरत मेहनत यांचा सुंदर संगम आहे. अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेली ही झेप ग्रामीण भागातील तरुणाईसाठी आशेचा किरण आहे. स्वप्न मोठे असावे, मेहनत प्रामाणिक असावी आणि आत्मविश्वास दृढ असावा, यश नक्कीच मिळते, हे सुजाता मडके यांच्या यशकथेतून स्पष्ट जाणवते, असेही गौरवोद्गार सरनाईक यांनी काढले. संपूर्ण परिवहन विभागाने सुजाता मडके यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

सुजाता यांचे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण हे शिरगाव जिल्हा परिषद शाळेत झाले. सुजाता यांनी शहापूर येथील ग. वि. खाडे विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करून भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) खरगपूर येथे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या कार्यक्रमांतर्गत व्हर्च्युअल लॅब प्रोजेक्ट -३ मध्ये रिसर्च इंजिनिअर म्हणून काम केले. सुजाता यांची सहाय्यक अभियंता म्हणून महाजेन्को मध्ये निवड झाली होती. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) मध्ये सायंटिस्ट – बी पदाच्या मुलाखतीपर्यंत आणि भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी), ट्रॉम्बेच्या टेक्निकल ऑफिसर पदाच्या मुलाखतीपर्यंत त्यांनी धडक मारली होती. तसेच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षेत यश संपादन करून ठाणे येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत होत्या. दरम्यान नुकताच त्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), बेंगळुरूमध्ये सायंटिफिक ऑफिसर (एसओएससी) या पदावर रुजू झाल्या.