मुंबई : अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत ‘शक्ती’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा राज्यावर कोणातही प्रभाव नसेल, तसेच या चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्याच्या इतर भागात मुसळधार पाऊस पडणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळाचा फारसा प्रभाव महाराष्ट्रावर नसेल. चक्रीवादळामुळे मुंबईसह इतर भागात पुढील दोन – तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळेल, अशी माहिती समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आली आहे. मात्र, या चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर होणार नसून मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. ‘शक्ती’ चक्रीवादळ वायव्य व ईशान्य अरबी समुद्रावर शनिवारी सकाळी ११.३० च्या आसपास होते. ते द्वारकेहून सुमारे ५१० किमी पश्चिमेस, कराचीहून (पाकिस्तान) ४५०किमी नैऋत्य दिशेस, मसिराहून (ओमान) ५७० किमी पूर्व-ईशान्येस आहे.

रविवारपर्यंत ते पश्चिम-मध्य अरबी समुद्रात जाणार असून, सोमवारी सकाळी पूर्व-ईशान्येस सरकत कमकुवत होईल. या कालावधीत मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.दरम्यान, राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. काही भागात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ झाली आहे. याचबरोबर उकाडा सहन करावा लागत आहे. राज्यातील बहुतांश भागात रविवारपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. विदर्भात, मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

मोसमी वाऱ्यांचा प्रवास जैसे थे

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर भारताच्या बहुतांश भागातून माघार घेतली आहे. मोसमी वाऱ्यांची सीमा शनिवारी वेरावल, भरूच, उज्जैन, झांसी, शाहजहानपूर भागात होती.

तापमान कमी

देशात ऑक्टोबर महिन्यात किमान आणि कमाल तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. मात्र, ईशान्य भारत, पूर्व भारत, पश्चिम हिमालयीन राज्य आणि सौराष्ट्र, कच्छमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान राहण्याचा अंदाज आहे. देशातील काही भागांत किमान तापमान सरसरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. पूर्व-मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतात किमान तापमान अधिक राहील.