शरद काळे, निवृत्त सनदी अधिकारी

घरातील वातावरण मध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि वाचन व अभ्यासाला महत्त्व देणारे होते. त्यामुळे वाचनाची गोडी आणि आवड लहानपणापासूनच लागली. वाढदिवसाला भेट म्हणून अनेकदा पुस्तकेच दिली जायची. साने गुरुजी यांचे ‘श्यामची आई’, ना. धो. ताम्हनकर यांचे ‘गोटय़ा’ आणि अन्य बालसाहित्याचे वाचन त्या वयात झाले. आमच्या शाळेत एक पद्धत होती. एखाद्या विषयाचे शिक्षक वर्गावर आले नाहीत की ‘ऑफ’ पीरियडला शाळेतील पुस्तकांची पेटी त्या वर्गात आणून ठेवली जायची. त्यामुळे त्या वयात शालेय जीवनात क्रमिक पुस्तकांबरोबरच ‘इतिहास’ विषयावरील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अन्य काही लेखकांच्या पुस्तकांचे वाचन झाले.

अकरावी मॅट्रिक व पुढील काळात इंग्रजी पुस्तकांचे वाचन जास्त प्रमाणात झाले. रा. शं. वाळिंबे यांचा पुतण्या माझा मित्र होता. कोणतेही पुस्तक वाचून झाल्यानंतर तो त्या पुस्तकाविषयी, पुस्तकात काय आहे, कोणत्या विषयावर आहे याची नोंद डायरीत करायचा. पुस्तक वाचनाच्या बाबतीत त्याच्या सूचनांचा, त्याने केलेल्या नोंदींचा मला उपयोग झाला. कला शाखेचे पदवी शिक्षण घेत असताना पु. ग. सहस्रबुद्धे, व. दि. कुलकर्णी आमचे शिक्षक होते. काय वाचले पाहिजे याविषयी ‘पुगं’चे नेहमी मार्गदर्शन मिळाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘काळे पाणी’, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची चरित्रे, लोकमान्य टिळक यांच्या आठवणी अशा पुस्तकांचे वाचनही त्या वेळी झाले.

शेक्सपिअर, शेले आदी इंग्रजी लेखकांची पुस्तकेही याच काळात वाचली. विज्ञान, तत्त्वज्ञान, इतिहास, चरित्र-आत्मचरित्र हे विशेष आवडीचे विषय. यात ‘श्रीमद्भगवद्गीता’ माझ्यासाठी केंद्रस्थानी होती. तसेच ‘ज्ञानेश्वरी’, ‘गीता रहस्य’, ‘गीता प्रवचने’ आदी ग्रंथांचेही वाचन झाले. ‘ओशो’ यांचीही बरीच पुस्तके वाचली. काही वर्षांपूर्वी विपश्यना केली तेव्हा बौद्ध धर्माशी संबंधित अनेक पुस्तके वाचली.

बृहन्मुंबई महापालिकेत आयुक्त म्हणून काम करताना मुंबईचा इतिहास जाणून घेण्यासाठी प्रा. न. र. फाटक आणि अन्य मंडळींची मुंबईविषयक पुस्तके वाचली. सनदी अधिकारी म्हणून काम करत असताना यशवंतराव चव्हाण, शंकरराव देव, मोरारजी देसाई, एस. एम. जोशी यांनी लिहिलेलीही पुस्तके वाचली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ समजून घेण्यासाठी या पुस्तकांची मदत झाली. ‘शहर नियोजन आणि विकास’, ‘शहर व्यवस्थापन’ या विषयावरील वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन सध्या सुरू आहे. ‘धम्मपद’ हे पुस्तकही वाचतोय. ललित साहित्य प्रकारातील कथा-कादंबरीपेक्षा कवितांची विशेष आवड आहे. त्यामुळे काव्यविषयक पुस्तकेही वाचली. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि अन्य कवींच्या कवितांचे वाचन झाले.

मला असे वाटते की आताच्या पिढीच्या वाचनाचे स्वरूप बदलले आहे. माहितीचे महाजाल, विविध सामाजिक माध्यमे, ब्लॉग या सारख्या आधुनिक माध्यमातून ही नवी पिढी लिहितेय आणि वाचनही करते आहे. आजही काही जण पुस्तके हातात घेऊन वाचणारे आहेत. मला स्वत:लाही आधुनिक तंत्राने पुस्तके वाचण्यापेक्षा ती हातात घेऊन वाचायला जास्त आवडतात. पुस्तक आपल्याला पाहिजे तेव्हा विनासायास वाचता येते. पुस्तकाची पाने उलटणे, पुढील पानांवरून मागील पानांवर येणे, महत्त्वाच्या ओळी किंवा भाग असेल तर त्याला खूण करून ठेवणे, त्यावर अभ्यास, चिंतन करणे शक्य होते आणि ते हातात पुस्तक घेऊन वाचल्यानेच अधिक चांगले होते. आता ‘एशियाटिकसोसायटी’च्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना पुस्तकांशी अधिक जवळून आणि दररोज संबंध येतो. लेखक, संशोधक, अभ्यासक यांच्याशी भेटीगाठी आणि संवाद साधला जातो. पुस्तकात राहणे मला आवडते. वाचन ही निरंतर आनंद देणारी गोष्ट आहे. वाचनामुळे आयुष्य, आपली दृष्टी आणि विचार अधिक विशाल आणि संपन्न होतात. पुस्तके आणि वाचन आपल्याला जगण्याचे भान देतात. वाचनाचे संस्कार कायमचे मनावर कोरले जातात.