मुंबई : सदोष मतदार याद्यांचा मुद्दा विरोधकांकडून वारंवार मांडला जात आहे. निवडणूक आयोगाकडून यावर प्रतिसाद निळत नसल्याने याविरोधात महाविकास आघाडीतील घटकपक्ष, मनसे व समविचारी पक्षांच्या वतीने शनिवारी ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
मोर्चाच्या तयारीसाठी महाविकास आघाडी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली व मोर्चाची रूपरेषा ठरविण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह डावे तसेच मित्रपक्षांचे वरिष्ठ नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. मेट्रो सिनेमापासून हा मोर्चा सुरू होऊन महापालिका मुख्यालयासमोर त्याचे रूपांतर सभेत होणार आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते नसीम खान, प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, आमदार आदित्य ठाकरे, आमदार ॲड. अनिल परब, शेकापचे जयंत पाटील, भाकपचे प्रकाश रेड्डी आदी यावेळी उपस्थित होते.
. मतचोरी, निवडणुकांमधला गैरव्यावहार या सगळ्यांच्या बाबतीतला आयोगाचा जो बेजबाबदार कारभार सुरू आहे, त्यातील सत्य लोकांना कळावे आणि असत्य जनतेसमोर जावे यासाठी ‘सत्याचा मोर्चा’ काढला जाणार आहे. ज्यांना निवडणुकीत मतचोरी झाली आहे असे वाटत आहे ते सर्व नागरिक या मोर्चात सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीचे सर्व मित्रपक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मोर्चात सहभागी होतील, अशी माहिती शिवसेना (ठाकरे) नेते आमदार अनिल परब यांनी दिली.
मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी शनिवारी दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीट येथून मोर्चास प्रारंभ करून तो ४ पूर्वी संपवायचे नियोजन आहे. मोर्चाला ४८ तासांपूर्वी परवानगी मिळेल, असेही परब म्हणाले. हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल. तेथे जाहीर सभा होऊन प्रमुख नेते पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार असून पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहून आपली भूमिका स्पष्ट करतील, असे पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केले.
