Sharad Pawar warning to the Basavaraj Bommai Karnataka government Mumbai news ysh 95 | Loksatta

Maharashtra Karnataka Dispute : संयमाचा अंत पाहू नका; शरद पवार यांचा कर्नाटक सरकारला इशारा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची सीमा प्रश्नाच्या संदर्भातील विविध विधाने ही देशाच्या ऐक्याला धोका आणणारी आहेत.

Maharashtra Karnataka Dispute : संयमाचा अंत पाहू नका; शरद पवार यांचा कर्नाटक सरकारला इशारा
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मुंबई: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची सीमा प्रश्नाच्या संदर्भातील विविध विधाने ही देशाच्या ऐक्याला धोका आणणारी आहेत. सीमाभागात हिंसाचाराच्या घटना आताच कशा घडल्या आहेत. त्यातून जर काही अघटित घडल्यास त्याला बोम्मई जबाबदार असतील. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले पाहिजेत. आम्ही संयम राखतो. आमचाही संयम सुटू शकतो. याची संपूर्ण जबाबदारी कर्नाटक सरकारची असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुंबईत मंगळवारी दिला.

मागील काही दिवसांपासून हे प्रकरण वेगळय़ा स्वरूपात नेण्याचा प्रयत्न  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सुरू आहे. त्यामुळे सीमाभागातील परिस्थिती गंभीर बनली आहे. माझा सीमा प्रश्नांशी अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे. मला सत्याग्रह करावा लागला होता. प्रसंगी लाठय़ा खाव्या लागल्या आहेत. ज्यावेळी असे काही सीमाभागात घडते त्यावेळी सीमाभागातील घटक माझ्याशी संपर्क साधतात. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास मज्जाव केला जातो. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येथे येऊन आपणास  धीर द्यावा, असा संदेश केला आहे. त्यामुळे गरज पडली तर मी बेळगावला जाणार, असेही पवार यांनी ठणकावून सांगितले. 

हेही वाचा >>> Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला!; राज्यातील वाहनांवर कन्नडिगांचा हल्ला; राज्यभर तीव्र पडसाद

दौऱ्याची तारीख जाहीर करा -अजित पवार यांचे आव्हान

बेळगावला कधी भेट देणार, याची तारीख जाहीर करा, असे आव्हान विरोघी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला दिले.  ‘अरे’ला ‘कारे’ हे उत्तर द्यायची हिंमत महाराष्ट्र सरकारने कर्नाटक राज्याच्या बाबतीत दाखवावी, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. कर्नाटकात राज्यातील गाडय़ांवर हल्ला हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरील हल्ला आहे. अशा भ्याड हल्ल्याच्या आडून सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा कर्नाटक राज्याचा प्रयत्न आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; ६६० बस फेऱ्यांवर परिणाम

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील गाडय़ांना काळे फासले

पुणे : स्वारगेट भागातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी गाडय़ांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. गाडय़ांवर ‘जय महाराष्ट्र ’ अशी घोषणा लिहून कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध केला. कर्नाटकात महाराष्ट्रातील गाडय़ांवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद पुण्यात उमटले. स्वारगेट भागातील सना ट्रॅव्हल्सच्या परिसरात कर्नाटकातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडय़ा थांबल्या होत्या. कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील गाडय़ांना काळे फासून ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा गाडीवर लिहिली.  या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 00:02 IST
Next Story
महाराष्ट्र-कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा