मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत १९८९ मध्ये ‘भ्रष्टाचार’ चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर ‘किशन कन्हैया’, ‘योद्धा’, ‘तिलक’, ‘प्रतीक्षा’, ‘जुवारी’, ‘बेवफा सनम’, ‘मृत्युदंड’ आदी विविध चित्रपटांमधून निरनिराळ्या भूमिका साकारत अभिनेत्री शिल्पा शिरोडकर घराघरात पोहोचली. पण २००० साली ‘गज गामिनी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शिल्पा शिरोडकर हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर झाल्या. पुढे बँकर अपरेश रणजीतशी लग्न केल्यानंतर दोघे सुरूवातीला नेदरलँड्स आणि त्यानंतर न्यूझीलंडला गेले. न्यूझीलंडला गेल्यानंतर स्वतःला व्यग्र ठेवण्यासाठी हेअरड्रेसिंग शिकून दोन महिने एका सलूनमध्ये काम केल्याचे शिल्पा शिरोडकर यांनी नुकतेच गौहर खान यांच्या ‘मा नोरंजन’ पॉडकास्ट कार्यक्रमात बोलताना सांगितले.
विविध चित्रपट, तसेच मालिकांमधून झळकल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस’ कार्यक्रमाच्या १८ व्या पर्वातही सहभागी झाली होती. २००० साली ‘गज गामिनी’ चित्रपटानंतर शिल्पा शिरोडकर मनोरंजनसृष्टीपासून दूर झाली. त्या काळात शिल्पा नेमकी काय करीत होती ? त्यांनी मनोरंजनसृष्टीतून एवढा मोठा ब्रेक का घेतला ? आदी विविध गोष्टींबाबत त्यांनी गौहर खान याच्या ‘मा नोरंजन’ पॉडकास्ट कार्यक्रमात मनमोकळेपणाने सांगितले. मनोरंजनसृष्टीत सक्रिय राहून विविध भूमिका साकारणे हा शिल्पाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. त्यामुळे हे क्षेत्र सोडून दूर न्यूझीलंडला गेल्यानंतर नेमके काय करावे ? एखाद्या गोष्टीत स्वतःला व्यग्र कसे ठेवावे ? आदी विविध प्रश्न तिला सतावत होते. याप्रसंगी स्वतःला व्यग्र ठेवण्यासाठी तिने हेअरड्रेसिंग म्हणजेच केशरचना शिकण्याचा निर्णय घेतला. ‘मेकअप’ आणि इतर अनुषंगिक कामे अभिनय कारकिर्दीशी जवळची असल्यामुळे तिने हेअरड्रेसिंग शिकण्यावर भर दिला. तेव्हा तिच्यासाठी हे काम सोपे नव्हते, मात्र तिने जिद्दीने हेअरड्रेसिंग शिकण्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यानंतर न्यूझीलंडमधील सलूनमध्ये दोन महिने कामही केले.
दरम्यान, ‘आमचे नुकतेच लग्न झाले होते आणि हेअरड्रेसिंग करण्याचे काम खूप कठीण होते. माझे पती आठवड्याच्या शेवटी सुट्टी घेत असे आणि मला त्याच दिवशी काम करावे लागत असे. आम्हाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ हवा होता. त्यामुळे नोकरी सोडली. यानंतर नेमके काय करणार ? असे पतीने विचारले. तेव्हा मी त्यांना सांगितले की, माझा रिझ्युम बनव. तेव्हा तो बोलला की त्यामध्ये काय लिहू ? मी सांगितले की काहीही खोटे लिहू नको. मी इयत्ता दहावीच्या परीक्षेत नापास झाले आणि माझ्या चित्रपटांबद्दल लिही. त्यानंतर मी विविध ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला. तसेच एकाच दिवशी दोन ठिकाणी मुलाखतीसाठी गेले आणि दोन्ही ठिकाणाहून अपॉईंटमेन्ट लेटर घेऊन आले’, असेही शिल्पा शिरोडकर म्हणाली. तेव्हा तिने नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, काम करण्यासही सुरुवात केली. यादरम्यान तिला थकवा जाणवू लागला आणि ॲसिडिटीचा त्रासही होऊ लागला. काही काळानंतर आपण गर्भवती असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर एका मुलीला जन्म देत पूर्णवेळ आई म्हणून कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय तिने घेतला.