मुंबई : बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना काँग्रेसने त्यांची जागा दाखवली, अशा शब्दांत नवी दिल्लीत आयोजित इंडिया आघाडीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसविल्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली. तर, उद्धव ठाकरे भाजपसोबत होते तेव्हा मान होता, पण जेव्हा हिंदुत्व, विचारधारा सोडली तेव्हा आता पदरी अपमानाची शेवटची रांग आल्याची टीका भाजपने केली.
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत केलेल्या सादरीकरणावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे मागील रांगेत बसल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. यावरून भाजप व शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
ठाकरे गट, राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना बैठकीत पुढेच बसवले होते. पण सादरीकरणासाठी जो पडदा होता, त्याच्या प्रकाशाचा डोळ्यांना त्रास होत होता. त्यामुळे आम्ही स्वत:च मागे बसायला गेलो, असे स्पष्टीकरण शिवसेेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. तर राष्ट्रवादी (शरद पवार) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकाच हास्यास्पद आहे. ही एक औपचारिक बैठक होती. त्यात कोणताही राजशिष्टाचार नव्हता. आम्हाला सहकुटुंब एकत्र जेवण्यासाठी तिथे बोलावले होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.