मुंबई : एका व्यक्तीच्या हातात देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहात नाही, हे आता जनतेला समजले आहे. म्हणूनच केंद्रात मजबूत पण संमिश्र सरकारची आवश्यकता आहे. सर्वांना बरोबर घेणारा कणखर नेता पाहिजे. जो देईल साथ, त्यांचा करू घात, अशी व्यक्ती, असा पक्ष आम्हाला अजिबात नको आहे, असे सांगत या निवडणुकीत हुकूमशाही विरुद्ध लोकशाही असा सामना रंगणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

भारत राष्ट्र समितीचे जळगावचे जिल्ह्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी शनिवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, पक्षप्रवेश वाढत असून राज्यात महाविकास आघाडी आणि देशात ‘इंडिया’ आघाडी मजबूत होत आहे. राज्यात आणि देशातही यावेळी परिवर्तन घडणार, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका; “दात पडलेला, नखं काढलेला, शक्तीहीन वाघ लोकांना..”

अटलबिहारी वाजपेयी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी संमिश्र सरकारे उत्तम चालवली. यांच्या सरकारांच्या काळात प्रगती झाली. म्हणून देश मजबूत करण्यासाठी आम्हाला संमिश्र सरकार पाहिजे. हुकूमशाही सरकार आल्यास स्वातंत्र्य संपुष्टात येईल. एका व्यक्तीचे सरकार आम्ही मान्य करू शकत नाही, असे उद्धव यांनी बजावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आश्वासने अपूर्ण

गेल्या दहा वर्षांत त्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी कोणतेही पूर्ण केले नाही. अच्छे दिन येणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येणार, तरुणांना रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, देश भ्रष्टाचारमुक्त करणार, अशी अनेक आश्वासने दिली गेली, पण एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. उलट इतर पक्षांतील भ्रष्टाचारी नेत्यांना स्वपक्षात घेत इतर पक्ष भ्रष्टाचारमुक्त केले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.