मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार का ? या चर्चेने जोर धरला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का ? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असून दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर दादरमधील मध्यवर्ती भागात असलेल्या शिवसेना भवनसमोरील बॅनरवर काका राज ठाकरे आणि पुतण्या आदित्य ठाकरे एकत्र पाहायला मिळत आहेत. ‘आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँडच चालणार’ असा मजकूर लिहून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हा बॅनर दादर – माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या (ठाकरे) युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावला असून या बॅनरबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँडची कायमच चर्चा असते. सध्या शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी चर्चा रंगली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत असून युती व्हावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात येत आहे. कोणी समाजमाध्यमांवर पोस्ट लिहून, कोणी व्हिडिओ अपलोड करून तर कोणी बॅनर लावून आपल्या भावना व्यक्त करीत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र यावेत, अशी प्रामुख्याने चर्चा दोन्ही पक्षांच्या वर्तुळात सुरू आहे. या चर्चेच्या प्रवाहात शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार’ असे वक्तव्य एका पत्रकार परिषदेत केले होते आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या मुखपृष्ठावरही उद्धव व राज ठाकरे यांचा एकत्र फोटो छापण्यात आला होता. यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून युतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांचा १३ जून आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र असलेला बॅनर थेट शिवसेना भवनसमोर लावून दोघांना एकत्र शुभेच्छा दिल्या आहेत. दादर – माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या (ठाकरे) युवा सेनेचे विभाग अधिकारी स्वप्निल सूर्यवंशी, उपविधानसभा चिटणीस हर्षल पळशीकर, युवासेना उपसचिव (महाराष्ट्र राज्य) रणजित कदम आणि प्रदीप सावंत यांनी हा बॅनर लावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शिवसेना आणि मनसेची युती व्हावी, ही मराठी माणसांची इच्छा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची महाराष्ट्र वाट पाहत आहे. सध्या यासंबंधी चर्चेला वेग आला असून सकारात्मक संकेत मिळत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या भावना व्यक्त करून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकत्रित वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत’, असे शिवसेनेच्या (ठाकरे) पक्षाच्या युवा सेनेचे पदाधिकारी आणि मुंबई विद्यापीठातील अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.