मुंबई : गोरेगाव येथील नस्को एक्झिबिशन सेंटर येथे शिवसेनेच्या (शिंदे) दसरा मेळाव्यानिमित्त गुरुवारी मुंबईच्याच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातुन मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. मुंबईत पाऊस कोसळत होता, पण कार्यकर्त्यांचा उत्साह कुठेही कमी झालेला नव्हता. शिवेसना जिंदाबादच्या घोषणेने शिवसैनिकांनी नेस्कोचा परिसर दणाणून सोडला होता. दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमके काय बोलणार हे ऐकण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक होते. त्यामुळे दुपारी ४ वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी नेस्को येथे जमण्यास सुरुवात केली. मिळेल त्या वाहनांनी कार्यकर्ते नस्को एक्झिबिशन सेंटर गाठत होते.
खासगी बसने येणाऱ्यांची संख्या मोठी होती. सायंकाळी ६ नंतर मोठ्या संख्येने खासगी बस येण्यास सुरुवात झाली. महिला, पुरुष आणि तरूणाईचा मोठा उत्साह यावेळी दिसला. तर मेळाव्यासाठी येणाऱ्या बस आणि इतर वाहनांमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये आणि कार्यकर्त्यांना शक्य तितक्या लवकर मेळाव्यास्थळी पोहचवताना पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. सायंकाळी ७ नंतर कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड वाढत गेली. मोठ्या संख्येने पावसातही कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
मेळाव्याच्या निमित्ताने नेस्को परिसरच नव्हे तर संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या संख्येने फलकबाजी करण्यात आली होती. अगदी चेंबूरपासून वांद्र्यापर्यंत आणि वांद्र्यापासून नेस्को आणि त्यापुढे बोरिवलीपर्यंत फलक लावण्यात आले होते. पश्चिम द्रुतगती महामार्गावर दुतर्फा फडकणाऱ्या झेंड्यांमुळे परिसर भगवामय झाला होता. एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक होते. त्यामुळे नेस्को परिसरात जो उत्साह होता तोच उत्साह मेळाव्यास्थळी होता. दरम्यान सायंकाळी ६ नंतर नेस्कोला येणाऱ्या वाहनांची संख्या वाढत गेली आणि त्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीच्या दिशेने वाहतूक कोंडीत वाढ झाली. काही काळ वाहनचालक-प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.