मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला मिळाव्या यासाठी दोन्ही पक्षांकडून रस्सीखेच सुरू आहे. २२७ प्रभागांच्या महापालिकेसाठी दीडशेहून अधिक जागा लढवण्याचा आग्रह भाजपने धरलेला असला तरी शिवसेना (शिंदे) पक्षानेही १२५ जागांसाठी तयारी केली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाकडे १२५ जागांसाठी उमेदवार तयार आहेत.

येत्या महापालिका निवडणूकीत महायुतीमध्ये कशाप्रकारे जागा वाटप होणार याकडे सध्या सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. गेल्या पंचवीस तीस वर्षात एकसंघ शिवसेनेने भाजपला कधीच जास्त जागा दिल्या नव्हत्या. त्याची सल भाजप कार्यकर्त्यांच्या मनात असून शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणूकीत महायुतीत समसमान जागा वाटप होणार की भाजप स्वतःकडे जास्त जागा घेणार याबाबत उत्सुकता आहे. यावेळी जास्तीत जास्त जागा लढवून सर्वात मोठा विजय मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. महायुतीमधला मोठा भाऊ म्हणून जागा वाटपात जास्तीत जास्त जागा आपल्याकडे घेण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

भाजपने या निवडणूकीत १५० जागा लढवण्याचा आग्रह धरला आहे. शिवसेना (शिंदे) पक्षासाठी ६० ते ७५ जागा दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र समसमान जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आग्रह आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या विधानांमधून जास्तीत जागा मिळवण्याचा आग्रह अधोरेखित होत असतो. २०१७ च्या निवडणूकीत भाजपने स्वबळावर २०० जागा लढवून ८२ जागा जिंकल्या होत्या. मात्र तरीही महापौर पदाचा आग्रह न धरता पहारेकरी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत भाजप कुठल्याही परिस्थितीत जागा वाटपात कमीपणा घेणार नाही अशी चर्चा आहे. पण दुसरीकडे शिवसेना (शिंदे) पक्षानेही जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

शिवसेनेत फूट पडल्यापासून गेल्या तीन वर्षात एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सुमारे १२५ माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. हे सगळे माजी नगरसेवक अर्थात जागा लढवण्यास इच्छुक आहेत. याबाबत शिंदे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे की, २०१७ ते २०२२ या कार्यकाळातील ६५ माजी नगरसेवकांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्याच्या आधीच्या कार्यकाळातील ६० ते ६२ नगरसेवक आमच्या पक्षात आले आहेत. त्यामुळे सध्या आमच्याकडे १२५ माजी नगरसेवक आहेत. महायुतीच्या जागावाटपात किती जागा मिळतील आणि किती जागा मिळाव्यात याचा निर्णय सर्वस्वी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे घेतील. पण हे १२५ माजी नगरसेवक पुन्हा नगरसेवक होण्यास उत्सुक आहेत, असेही म्हात्रे यांनी म्हटले आहे.