मुंबई : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने मुंबईतील महिला विधानसभा प्रमुख, विधानसभा संघटक आणि विधानसभा संचालिका पदाच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दहिसर विधानसभा प्रमुखपदावर तेजस्वी घोसाळकर यांचे नाव कायम ठेवण्यात आले आहे. तर शिवडी मतदारसंघात विधानसभा प्रमुखपदी आमदार अजय चौधरी यांच्या स्नुषा गौरी चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर ही नावे जाहीर झाल्यामुळे या यादीला महत्त्व आले आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकून सत्ता हाती ठेवण्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, पदाधिकारी जाहीर करणे अशी तयारी सुरू केली आहे. पक्षश्रेष्ठींनी विधानसभा प्रमुख, विधानसभा संघटकांची अधिकृत नावांची यादी मुखपत्रातून जाहीर केली आहे. त्यात मंगळवारी महिला विधानसभा प्रमुख, विधानसभा संघटक आणि विधानसभा संचालिका पदाच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पहिलेच नाव माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचे आहे.
घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वी याच पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्या नाराज असल्याची पक्षात चर्चा होती. विधानसभा स्तरावरील बैठकांनाही त्या हजर राहत नसल्याचे या मतदारसंघातील कार्यकर्ते सांगतात. त्या पक्ष सोडणार असल्याचीही चर्चा होती. मात्र आपण ठाकरे यांच्याबरोबरच असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले व उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. त्यातच या यादीत तेजस्वी घोसाळकर यांचे नाव कायम ठेवण्यात आल्याचे चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
घराणेशाही सुरू असल्याची कुजबूज
शिवडी विधानसभा प्रमुखपदी आमदार अजय चौधरी यांच्या स्नुषा गौरी चौधरी यांना संधी देण्यात आली आहे. गौरी चौधरी यांना यापूर्वी विधानसभा संघटक पद दिले होते, तेव्हाही शिवडीतील महिला कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र तरीही त्यांना आता पक्षाने आणखी वरचे पद दिले आहे. त्यामुळे पक्षात घराणेशाही सुरू असल्याची कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
पालिकेच्या निवडणुकीसाठी दावेदारी
पालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून शिवसेनेतील पारंपरिक पद्धतीनुसार शाखाप्रमुखालाही उमेदवारी मिळते. मात्र गेल्या काही वर्षात ही पद्धत बदलत असून नेत्यांच्या जवळच्यांनाच संधी मिळते. त्यातच आता ज्यांची नावे विधानसभा संघटक, विधानसभा प्रमुख म्हणून जाहीर झाली आहेत, त्यांनाच उमेदवारी मिळणार आणि कार्यकर्त्यांना डावलणार, अशीही चर्चा सुरू आहे.