मुंबई : माहीम येथील मुंबई महानगरपालिकेची न्यू माहीम शाळा इमारत धोकादायक असल्याचे कारण पुढे करून पालिका प्रशासनाकडून ती बंद केली असून लवकरच शाळेचे पाडकाम करण्यात येणार आहे. मात्र, शाळा संरचनात्मकदृष्ट्या मजबूत असल्याचा दावा पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. शाळेच्या पाडकामाला विरोध करणाऱ्या पालकांना आता शिवसेनेचाही (ठाकरे) पाठिंबा मिळाला असून आमदार महेश सावंत यांनी सोमवारी रात्री शाळेची पाहणी केली. तसेच, शाळा सुस्थितीत असल्याचे आढळल्याने त्यांनीही शाळा न पाडण्याची भूमिका घेतली. तसेच, यासंदर्भांत महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी पालकांना दिले.

न्यू माहीम शाळेचे सुमारे सात – आठ वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. अल्पावधीतच शाळा धोकादायक असल्याचे घोषित केल्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. तसेच, यासंदर्भात शाळेबाहेर कोणतीही नोटीस लावण्यात आली नाही. या शाळेत शिकणाऱ्या मराठी, हिंदी, कन्नड आदी माध्यमांतील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांचे दूरच्या अन्य शाळांमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड पायपीट करावी लागण्याची शक्यता आहे. याच परिसरातील पालिकेच्या मोरी रोड माहीम शाळेची इमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली तीन वर्षापूर्वी पाडण्यात आली. मात्र, अद्याप तिचे बांधकाम झालेले नाही. त्यामुळे न्यू माहीम शाळाही कोणाच्या तरी आर्थिक हितासाठी पाडण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. आम आदमी पक्षातर्फे या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

स्थानिक आमदार महेश सावंत यांच्याकडे पक्षाने शाळा न पाडण्याची मागणी केली होती. तसेच, शाळेची प्रत्यक्ष पाहणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार सोमवारी रात्री महेश सावंत यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी अभिनेत्री चिन्मयी सुमित, सामाजिक कार्यकर्ते व पालक उपस्थित होते. शाळेचे बांधकाम भक्कम असूनही इमारतीला धोकादायक श्रेणीत कसे टाकले, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच, उपस्थित पालकांसमोर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून शाळा न पाडण्याची मागणी केली. या प्रकरणी पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या शाळेच्या पाडकामास विरोध करणारे नागरिक व पालकांना गेल्या आठवड्यात मराठी अभ्यास केंद्रानेही पाठिंबा दिला होता. शाळा बंद करण्याचा निर्णय कोणाचा याचा शोध घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीने सांगितले होते. तसेच, शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीचे प्रमुख डॉ. दीपक पवार आणि अभिनेत्री व मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. तसेच, शाळा सुस्थितीत असून आर्थिक हितासाठी पाडण्यात येत असल्याचा आरोप समितीने केला होता.प्रशासन जोपर्यंत शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आम आदमी पक्षाच्या प्रणाली राऊत यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुन्हा संरचनात्मक तपासणीची मागणी

न्यू माहीम शाळा पाडल्यानंतर पुन्हा तेथे शाळा बांधली जाईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शाळा इमारतीचे संरचनात्मक तपासणी केल्यांनतर १७ डिसेंबर २०२४ रोजी शाळेची इमारत ‘सी – १’ श्रेणीत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. शाळेच्या इमारतीची पुन्हा संरचनात्मक तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आम आदमी पक्षाने पालकांच्या स्वाक्षरीसह शाळा पाडू नये या मागणीचे निवेदन भूषण गगराणी यांना दिले आहे.