मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना(ठाकरे) आणि मनसेची युती नेमकी कधी होणार याची प्रतीक्षा असतानाच हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. बेस्ट पतपेढीची (दी बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटी) निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय या दोन्ही पक्षांनी घेतला असून यासाठी दोन्हीकडच्या उमेदवारांचे एकच ‘उत्कर्ष पॅनेल’ या निवडणुकीत उतरवण्यात आले आहे.

हिंदी सक्ती विरोधाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थान गाठले. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती व्हावी यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत मोठा उत्साह आहे. या दिशेने पहिले पाऊल हे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना आणि शिवसेना (ठाकरे) प्रणीत बेस्ट कामगार सेनेने ही निवडणूक युतीत लढण्याचा निर्णय घेतला आहे. १८ ऑगस्टला ही निवडणूक पार पडणार आहे. सध्या या पतपेढीवर ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे.

यासंदर्भात बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी पत्रक काढून दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. बेस्ट उपक्रम उद्योगपतींना आंदण देण्याला दोन्ही पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे ‘बेस्ट’मध्ये एकत्र येणे म्हणजेच मराठी माणसाची एकजूट महत्त्वाची आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे आता बेस्टमधील प्रत्येक लढाई आता बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना यापुढे ‘बेस्ट’मधील प्रत्येक लढाई एकत्रित लढेल असे म्हटले आहे. या दोन्ही संघटनांनी संयुक्त ‘उत्कर्ष पॅनेल’ तयार केले असून त्यासंदर्भातील एकत्रित बॅनरही तयार करण्यात आला आहेत.

बेस्ट ही मुंबईतील महत्त्वाची संस्था मानली जाते. येथील पतपेढीच्या निवडणुकीत युती झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ही युती कायम राहण्याची शक्यता वर्तविली जते.