मुंबई : शिवसेनेच्या (ठाकरे) शिवडीतील शाखेने स्वखर्चाने इंदिरानगर परिसरातील रहिवाशांना रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करून दिले. अंतर्गत गल्लीतील या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे दुरुस्ती करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली होती. मात्र विरोधी पक्षातील नगरसेवक, आमदारांना निधीच मिळत नसल्यामुळे या भागातील शिवसेनेच्या (ठाकरे) शाखेने स्वखर्चाने रस्त्याचे काँक्रीटीकरण केले.

मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. सध्या पावसामुळे ही कामे बंद आहेत. तब्बल १७ हजार कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. दोन टप्प्यात ही कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र शिवडीतील एका अंतर्गत रस्त्याची महापालिकेने नव्हे, तर शिवसेनेच्या (ठाकरे) शाखेने कॉंक्रीटीकरण करून दिले.

शिवडी पूर्व येथील इंदिरा नगरस परिसरातील या अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण शिवसेना (ठाकरे) शाखा क्रमांक २०६ च्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिलेली असताना तब्बल सहा रेडी मिक्सर आणून या १८०० फूट लांबीच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात आले. या पद्धतीने शिवसेनेच्या (ठाकरे) शाखेने स्वखर्चाने केलेल्या कॉंक्रीटीकरणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

याबाबत येथील स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले की, या अंतर्गत रस्त्याची अत्यंत दूरवस्था झाली होती. त्यामुळे रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी रहिवाशांनी केली होती. मात्र सध्या आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा निधी नाही. नगरसेवक निधी नाही. तसेच विरोधीपक्षांना निधी मिळत नाही हे आता उघड झाले आहे. त्यामुळे आम्हीच हा रस्ता तयार केला. या रस्त्यासाठी आम्ही सहा ते सात लाख रुपये उभे केले. हा रस्ता बीपीटीच्या अखत्यारित येतो. त्यामुळे या रस्त्यासाठी निधी मिळणे तर आणखीच अवघड होते. बीपीटीकडून पायाभूत सुविधांसाठी नेहमीच हात आखडता घेतला जातो. त्यामुळे अखेर आम्हीच नागरिकांच्या सोयीसाठी हे काम करून दिले आहे.

इंदिरा नगरमधील ज्या गल्लीत हे कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे ती गल्ली अतिशय अरुंद असून आत मिक्सही जाऊ शकत नाही. त्यामुळे १८० फूट लांब पाईप तयार करून त्याद्वारे रेडी कॉंक्रीट टाकण्यात आले. चार इंच थराचे कॉंक्रीट टाकण्यात आल्याचे पडवळ यांनी सांगितले.