मुंबई: मावळ तालुक्यातील (जि. पुणे) इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेची विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील त्रीसदस्यीय समितीकडून चौकशी करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
अमोल खताळ, विक्रम पाचपुते आदी सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून याबाबत चर्चा उपस्थित केली होती. त्यावर बोलताना, इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल धोकादायक असल्याचे घोषित करून त्यावर हा पूल वापरू नये अशा सूचना लावल्या होत्या. मात्र या पुलावर पर्यटकांची गर्दी झाल्याने ही दुर्दैवी घटना घडून चार व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे मंत्र्यांनी सांगितले. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या १६ हजार ३४५ पुलांचे नियमित संरचनात्मक परिक्षण, दुरुस्ती व सुरक्षिततेचे काम वेळोवेळी होत असल्याचे सांगून भोसले म्हणाले, राज्यात सध्या चार पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असून त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येत आहे. याशिवाय आणखी आठ पुलांचा संरचनात्मक परिक्षण प्राप्त होताच त्यांचीही दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी केली जाईल. पावसामुळे राज्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्याच्या तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.