मुंबई : निवडणूक आयोग आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतरही ठाकरे गटाकडून प्राप्तिकर विभाग, टीडीएस लॉग इन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर सुरू असल्याची तक्रार शिंदे गटाने मुंबई पोलिसांकडे केली होती. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. या लॉग इनद्वारे कोणाकडून रक्कम भरण्यात आली, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. शिंदे गटाचे किरण पावसकर, खजिनदार बालाजी किणीकर आणि सचिव संजय मोरे यांनी ३० जानेवारीला मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन ठाकरे गटाकडून प्राप्तिकर विभागाचे लॉग इन आणि पासवर्डचा गैरवापर सुरू असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली होती.

हेही वाचा : विश्लेषण: आता नायगाव ते अलिबाग मेट्रोची धाव? कसा असेल हा मार्ग? 

मुंबई पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी आता प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला. शिवसेनेच्या नावाच्या लॉग इन आयडी व पासवर्डचा गैरवापर झाला का? तो कोणी केला? कोणत्या बँक खात्यातून टीडीएस व प्राप्तिकराची रक्कम भरण्यात आली? या प्रकरणात दखलपात्र गुन्हा घडला आहे का? याबाबतची पडताळणी सुरू आहे. याप्रकरणी तांत्रिक तपासाची आवश्यकता असल्यामुळे सायबर पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे येणाऱ्या तक्रारीप्रकरणी सर्वात आधी प्राथमिक चौकशी केली जाते. आरोपांमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena eknath shinde complaint against uddhav thackeray shivsena for misuse of password mumbai print news css
First published on: 13-02-2024 at 11:33 IST