भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ अनिल परब यांनी ईडीच्या कोठडीत जाण्यासाठी बॅग भरून तयार रहावं अशी टीका केली. सोमय्यांच्या या टीकेला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यांनी प्रत्युत्तर दिलंय. तसेच बॅग भरून तुरुंगात जायला ही काय सहल आहे नाही, असा टोला लगावला. ज्याच्यावर विक्रांतचे पैसे खाल्ल्याचा आरोप आहे त्या व्यक्तीने दुसऱ्यांवर असे आरोप करणे हास्यास्पद आहे, अशीही टीका परब यांनी केली. ते लोकसत्ता डॉट कॉमसाठी ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल परब म्हणाले, “बॅग भरून जेलमध्ये जायला ही काही ट्रीप नसते. कुणीही बॅग भरून जेलमध्ये ट्रीपला जात नाही. मी गुन्हेगार असेन, माझ्यावरील गुन्हे सिद्ध झाले तर मला जी शिक्षा देण्यात येईल ती मला मान्य करावीच लागेल. मात्र, मी गुन्हेगार नसेन आणि तरीही कुणी आरोप करत असेल तर त्याची उत्तरं त्यांनाही द्यावी लागतील. किरीट सोमय्यांकडून बदनामी करण्याचं काम होतंय. खोटी कागदपत्रे दाखवली जात आहेत, त्यावरून भ्रम तयार केला जात आहे आणि सगळे भ्रष्ट आहेत असं दाखवलं जातंय.”

हेही वाचा : ईडीच्या १३ तास चौकशीनंतर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “साई रिसॉर्टचे मालक…”

व्हिडीओ पाहा :

“ज्याच्यावर विक्रांतचे पैसे खाल्ल्याचा आरोप आहेत त्या व्यक्तीने दुसऱ्यांवर अशाप्रकारचे आरोप करणे हास्यास्पद आहे. याच्या दोन्ही बाजूंनी चौकशा सुरू आहेत. आमचं म्हणणं आहे की चौकशा होऊ द्या. चौकशी अंती खरं बाहेर येईल,” असं अनिल परब यांनी नमूद केलं.

“मुंबई महापालिकेवर सेनेचाच भगवा फडकणार”

अनिल परब पुढे म्हणाले, “शिवसेनेवर मुंबईकरांचे प्रेम आहे. मुंबईत शिवसेना हवी ही लोकांची भावना आहे कारण अर्ध्या रात्री अडचण आली तर शिवसेनाच लोकांसाठी धावते. विक्रांतचे पैसे खाणाऱ्या किरीट सोमय्यांच्या आरोपांना लोक किंमत देत नाही.”

“शिवसेना शिंगावर घ्यायला सज्ज”

“भाजपाकडून शिवसेनेला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न सुरू आहेत, पण लोक आता भाजपाला ओळखून आहे. शिवसेनेच्या अंगावर येणाऱ्या कोणालाही शिंगावर घ्यायला शिवसेना समर्थ आहे,” असा इशारा अनिल परब यांनी दिला.

“भाजपाकडून शिवसेना-आघाडी सरकारला बदनाम करायचं राजकारण सुरू आहे. त्यासाठी किरीट सोमय्या सारख्यांचा वापर केला जातो. मात्र, मुंबईकर भाजपाचा हा डाव उधळून लावतील आणि मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. मुंबईकर भाजपाच्या बदनामीचा डाव ओळखून आहेत. भाजपाच्या आठ वर्षात महागाई-बेरोजगारी वाढली. २०२४ मध्ये जनता मत पेटीतून उत्तर देतील,” असंही त्यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader anil parab answer bjp ex mp kirit somaiya over allegations pbs
First published on: 06-06-2022 at 23:40 IST