काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे राज्यात गुरुवारी पडसाद उमटल्यानंतर आज या विषयावरुन पुन्हा राजकारण तापण्याची चिन्हं दिसत आहेत. भारतीय जनता पार्टी, शिंदे गटाबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक भूमिकेमध्ये दिसत आहे. भाजपा आणि शिंदे गटाने गुरुवारीच रस्त्यावर उतरून राहुल यांचा निषेध करत ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट करत केंद्रात भाजपची सत्ता असतानाही सावरकर यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार का देण्यात आला नाही, असा सवाल केला. याच दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींचा उल्लेख करत उद्धव ठाकरे, सोनिया गांधी भेटीचा संदर्भ देत या विषयावर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> सावरकरांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? संजय राऊतांचा राहुल गांधींना टोला; म्हणाले, “जे लोक कधी…”

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
सावरकर यांनी इंग्रजांना मदत केली होती, असे विधान राहुल गांधी यांनी मंगळवारी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान एका सभेत केले होते. त्यावरून भाजपा आणि शिंदे गटाने महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यास उद्धव ठाकरे यांनी भाजपासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. संघाला १०० वर्षे पूर्ण होत असली तरी स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान काय? असा सवाल ठाकरे यांनी केला. संघाचा स्वातंत्र्यलढय़ात सहभाग नसून, हिंदूंना वाचविण्यासाठी निजामाविरोधातही ते कधी लढले नाहीत. त्यामुळे संघ ही ज्यांची मातृसंस्था आहे, त्यांच्या पिल्लांनी आम्हाला सावरकरांविषयी शिकवू नये, असे ठाकरे म्हणाले.

नक्की वाचा >> “२०२३ मध्ये राज्यात निवडणूका लागणार; भाजपामध्येच प्रचंड…”; सुषमा अंधारेंनी सांगितलं ‘कामाला लागा!’

संजय राऊत काय म्हणाले?
“भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात उत्तम पाठिंबा मिळत होता. राहुल गांधींनी शेतकऱ्यांसंदर्भात भाष्य केलं. बेरोजगारीबद्दल ते बोलले. तसेच देशासमोर असलेल्या इतर प्रश्नांबद्दल त्यांनी भाष्य करत लोकांमध्ये जागृती निर्माण केली. मात्र या साऱ्यामध्ये वीर सावरकर कुठे आले मध्येच?” असा प्रश्न राऊत यांनी सावरकरांसंदर्भातील वादावर बोलताना उपस्थित केला.  “भारत जोडो यात्रेच्या अजेंड्यामध्ये वीर सावरकरांचा विषय नव्हता. हा तुमचा खासगी विषय आहे,” असं राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केल्याचं ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. “भारत जोडो यात्रेच्या अजेंड्यामध्ये वीर सावरकरांचा विषय नव्हता. हा तुमचा खासगी विषय आहे,” असं राऊत म्हणाले. “महाराष्ट्राला कायमच वीर सावरकरांचा गर्व वाटत राहणार. संपूर्ण देशाला सावरकरांचा अभिमान वाटतो. उद्धव ठाकरेंनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. वीर सावरकर आमचे आदर्श आहेत. आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर. राहुल गांधींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> जाहीर सभेत हातवाऱ्यांसहीत राज ठाकरेंची नक्कल करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल; म्हणाल्या, “जाणीवपूर्वकपणे महाराष्ट्रातील…”

त्या भेटीचा दिला संदर्भ…
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली दौऱ्याला गेले होते त्यावेळेचा संदर्भही दिला. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही (उद्धव ठाकरेंबरोबर) पहिल्यांदा दिल्लीला गेलो तेव्हा सोनिया गांधींच्या घरी चहापानासाठी गेलेलो. त्यावेळीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती की वीर सावरकर आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे आणि ते कायमच राहतील,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. २१ फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत १० जनपथ येथे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसहीत शिवसेनेच्या काही निवडक नेत्यांनी सोनिया गांधीची भेट घेतली होती. याच भेटीचा संदर्भ राऊत यांनी दिला आहे. राज्यामध्ये नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर दोनच महिन्यांनी उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन या भेटीदरम्यान सोनिया गांधींनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसकडून पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp sanjay raut give reference of sonia gandhi uddhav meeting regarding rahul gandhi comment on veer savarkar scsg
First published on: 18-11-2022 at 11:09 IST