अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबईत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठं आंदोलन केलं तर पोलिसांनी राणा दांपत्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी अटक केली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता अप्रत्यक्षपणे राणा दांपत्याने दिलेल्या आव्हानावर उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि तिकीट, पास काढताना रोख रक्कमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी ‘एकच सामायिक कार्ड’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) सुविधेचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राणा दांपत्यावर निशाणा साधला.

“साधु संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी म्हण आहे. पण आमच्या घरात दिवाळी असो, दसरा असो किंवा नसो साधु संत येतच असतात. शिवसेनाप्रमुख, माँसाहेब असतानाही येत होते, आताही येतात. पण ते नीट बोलून सांगून येतात. पण दादागिरी करुन याल तर दादागिरी कशी मोडून काढायची हे शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याखेत समजावून सांगितलं आहे,” असा इशारा उद्धव ठाकरेंना यावेळी अप्रत्यक्षपणे राणा दांपत्याला दिला.

राज ठाकरेंवर निशाणा

“ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झाली आहे, आगडोंब उसळला आहे, जळजळतंय, मळमळतंय काही कळत नाही. पण त्यांनी त्यांच्या राज्यातल्या किती राजधान्यांमध्ये, शहरांमध्ये मुंबईच्या शाळेचा दर्जा अंगीकारुन दाखवला आहे हे दाखवावं असं माझं आव्हान आहे. काम काहीच नाही आणि बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग असून मी काडीची किंमत देत नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर निशाणा साधला.

लवकरच जाहीर सभा

“लवकरच मी एक जाहीर सभा घेणार आहे. हल्ली सभेचं पेव आहे. सगळ्यांचा सोक्षमोक्ष मला लावायचा आहे. जे नकली व तकलादू हिंदूत्ववादी आले आहेत, मला त्यांचा समाचार घ्यायचा आहे आणि तो लवकरच घेणार,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

भाजपावर टीका

“हिंदुत्व सोडल्याची गेले काही दिवस माझ्यावर टीका होत आहे. हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का, घालावे आणि मग सोडावे. जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी हिंदुत्वासाठी काय केलं आहे? बाबरी पाडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. राममंदिर बांधण्याचा निर्णयदेखील तुमच्या सरकारने घेतलेला नाही तर कोर्टाने दिला आहे. मंदिर बांधतानाही तुम्ही झोळ्या पसरल्या आहेत, मग तुमचं हिंदुत्व कुठे आहे?,” अशी विचारणा यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.

“करोना गेला असं वाटत आहे. पण जोपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोपर्यंत तुम्हीदेखील मास्क काढू नका. मास्कसक्ती नसली तरी अजून मास्कमुक्ती झालेली नाही,” असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray on navneet rana ravi rana matoshree hanuman chalisa sgy
First published on: 26-04-2022 at 08:13 IST