मुंबई – मुंबई पोलीसांनी नालासोपारा येथे अमली पदार्थांचा कारखाना उघडकीस आणला होता. या कारवाईनंतर स्थानिक पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यापूर्वी मुंबई पोलीसांनी दोन वेळा वसईत अमली पदार्थविरोधी कारवाई केली होती. त्यावेळी कुठल्याही स्थानिक पोलीसांवर कारवाई करण्यात आली नव्हती हे विशेष.
शनिवारी टिळक नगर पोलीस आणि गुन्हे शाखा ६ च्या पथकाने नालासोपारा पूर्वेला महामार्गाजवळ असेलल्या रशिद कंपाऊंडमध्ये सुरू असेलला अमली पदार्थांचा कारखाना उध्वस्त केला होता. यावेळी १४ कोटींचे मॅफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
पेल्हार पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या गाळ्यात छुप्या पद्धतीने हा कारखाना सुरू होता. यामुळे मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी तडकाफडकी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना सेवेतून निलंबित केले आहे.
पोलीस दलात खळबळ
हा कारखाना ६ महिन्यांपूर्वी सुरू झाला असली तर तो पत्र्याच्या शेडमधील गाळ्यात छुप्या पद्धतीने सुरू होता. रासायनिक पदार्थ तयार केले जात असल्याचे भासविण्यात आले होते. प्रत्यक्षात रात्रीच्या वेळी अमली पदार्थ बनविण्यात येत होते. त्यामुळे स्थानिक पोलीसांना याबाबत काहीच कल्पना नव्हती. आरोपींनीही स्थानिक पोलीसांनी या संदर्भात लागेबांधे असल्याचे सांगीतले नाही. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्याला जबाबदार धरून निलंबित केल्याने पोलीस दलात नाराजी पसरली आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ कारखाना सुरू असल्याबाबत स्थानिक पोलीसांना माहिती नसणं हे अपयश आहे. परंतु त्या कारखान्याशी प्रत्यक्ष काही संबंध नसताना निलंबन करण्याची कारवाई ही अन्याय कारक असल्याचं मत अनेक वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी व्यक्त केले आहे.
आमच्या हद्दीत अनेक रासायनिक कारखाने आहेत. त्या प्रत्येकाची तपासणी करणे शक्य नाही आणि तसा थेट अधिकारही नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगीतले. अमली पदार्थांची कारवाई कधीही थेट होत नाही. कुणी तरी या धंद्यातील आरोपी हाती लागल्यानंतरच पुढील कारवाई होते, याकडेही पोलीसांनी लक्ष वेधले.
अमली पदार्थ विरोधी शाखेला अभय
या कारवाईमुळे पोलीस दलात चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी साकिनाका पोलीसांनी वसईच्या कामण येथे अमली पदार्थांची कारवाई केली होती. तर मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी शाखेनेही वसईत छापा टाकून अमली पदार्थ जप्त केले होते. त्यावेळी स्थानिक पोलिसांविरोधात कारवाई झाली नव्हती. अमली पदार्थाविरोधीत कारवाईसाठी अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याला जबाबदार धरण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे याच अमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रमुख सचिन कांबळे यांना पेल्हार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद देण्यात आले आहे.
