मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरील दोन मेट्रो स्थानकांमध्ये लवकरच विविध प्रकारची दुकाने, रेस्टाॅरन्ट, खाद्यपदार्थांचे स्टाॅल, एटीएम आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. बीकेसी आणि विमानतळ टी २ या दोन मेट्रो स्थानकांवरील जागेचा व्यावसायिक वापर करण्याच्या मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) निर्णयानुसार या स्थानकांमध्ये विविध प्रकारची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी एमएमआरसी आणि इंडिया रिटेल ॲण्ड हाॅस्पीटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (आयआरएचपीएल) कंपनीमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. आता पुढील कार्यवाही करून येत्या दोन महिन्यांत या दोन्ही स्थानकांमध्ये दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. ही दुकाने सुरू झाल्यास प्रवाशांना मेट्रो प्रवासाबरोबर खरेदीही करता येणार असून त्यांची स्थानकातच खानपानाची सोय होणार आहे.

एमएमआरसी ३३.५ किमी लांबीच्या भुयारी ‘मेट्रो ३’ मार्गिकेची उभारणी करीत आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये, तर बीकेसी – आचार्य अत्रे चौक मार्ग टप्पा मे २०२५ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. या मार्गिकेला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र हळूहळू प्रवासी संख्या वाढत असल्याचे एमएमआरसीचे म्हणणे आहे. प्रवासी संख्या वाढावी आणि प्रवाशांना प्रवास करताना खरेदी करता यावी, त्यांची खाण्यापिण्याची सोय व्हावी यासाठी २७ भुयारी मेट्रो स्थानकांतील सुमारे १.३ लाख चौरस फूट जागेचा वापर व्यावसायिक जागा म्हणून करण्याचा निर्णय याआधीच एमएमआरसीने घेतला आहे. त्यानुसार या जागा विविध कंपन्यांना भाडेतत्वावर वितरीत करण्यात आल्या आहे. प्रवाशांच्या सोयीबरोबरच तिकिटाव्यतिरिक्त इतर माध्यमातूनही महसूल मिळविण्याच्या उद्देशानेही या निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरसीला यातून चांगला महसूल मिळाला आहे. या जागा भाडेतत्वावर वितरीत करण्यात आल्यानंतर आता प्रत्यक्षात त्यांचा व्यावसायिक वापर सुरू करण्याच्यादृष्टीने एमएमआरसीने पावले उचलली आहेत. त्यानुसार बीकेसी आणि विमानतळ टी २ या दोन मेट्रो स्थानकांमध्ये दुकाने सुरू करण्यासाठी नुकताच आयआरएचपीएल सोबत करार करण्यात आल्याची माहिती एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीकेसी आणि विमानतळ टी २ मेट्रो स्थानकांमध्ये ३५ ठिकाणी ३२ हजार चौरस फूट क्षेत्राचा व्यावसायिक वापर करण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यांत ही दुकाने सुरू करण्याचे नियोजन आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच यामुळे प्रवासी संख्या वाढण्यास मदत होईल, असा विश्वासही एमएमआरसीला आहे. दरम्यान, या स्थानकांसह आणखी १५ मेट्रो स्थानकांमधील दुकानेही सुरू करण्याच्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी लवकरच करार करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे स्टार बाजारसारख्या सुपरमार्केट कंपनीने सिद्धीविनायक आणि कफ परेड मेट्रो स्थानकांमध्ये भाडेतत्वावर जागा घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांना मेट्रो प्रवासाबरोबरच सर्व प्रकारची खरेदीही करता येणार आहे.