मुंबईकरांना रोज अतिरिक्त ४५५ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्याची क्षमता असलेले मध्य वैतरणा धरण बुधवारी दुपारी ओसंडून वाहू लागले.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, मोडकसागर आणि तुळशी यापूर्वीच भरले असून बुधवारी दुपारी ४ वाजता मध्य वैतरणा धरणही भरून वाहू लागले. दोन वर्षांपूर्वी विक्रमी वेळेत धरणाचे काम पूर्ण होऊनही सरकारच्या नाकर्तेपणामुळे मध्य वैतरणावरील पुलाचे काम अडले होते. परिणामी आजवर फक्त ३०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. आता त्यातून ४५५ दशलक्ष लिटर पाणी मिळू शकेल. विहार तलावही ओसंडून वाहण्याच्या बेतात आहे.  तर भातसा धरणाची क्षमता १४२.०७ मीटर इतकी असून आजघडीला १३८.२० मीटर पाणीसाठा धरणात आहे.

मराठा, मुस्लीम आरक्षणाचे सरकारकडून समर्थन
मुंबई : सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला १६, तर मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाचे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात समर्थन केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात दोनवेळा या समाजांना मागासवर्गीय श्रेणीत आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात तो मागे घेण्यात आल्याचे कारण राज्य सरकारने आपल्या निर्णयाच्या समर्थनासाठी पुढे केले आहे.
केतन तिरोडकर यांच्यासह या आरक्षणाला विरोध करणाऱ्या आणि या आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या विविध याचिका दाखल असून न्यायालयाने राज्य सरकारला त्यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. सरकारतर्फे बुधवारी हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले.

व्यापाऱ्याला  लुटणाऱ्यास अटक
मुंबई: पोलीस असल्याची बतावणी करून एका व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीस घाटकोपर पोलिसांनी मंगळवारी सापळा लावून अटक केली. फैजुल अहमद सुशिल अहमद खान (३१) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रुपदास प्रजापती (३९) हे सोन्याच्या व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याकडे काम करतात. मागील शुक्रवारी ते आपल्या सहकाऱ्यासह दुचाकीवरून जात असताना भायखळा पूर्व येथील तळेवर चौकाजवळ एका टाटा सुमो जीपने त्यांना अडवले. या गाडीतून आलेल्या चौघांनी पोलीस असल्याचे सांगत प्रजापती यांना मारहाण केली आणि नंतर त्यांच्याकडील १२ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी पळवून नेली होती. या टोळीतील म्होरक्या फैजुल खान चोरी केलेल्या ऐवजासह शिवडी येथे येणार असल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी सापळा लावून त्याला अटक केली.

लैंगिक छळाच्या आरोपात अति़  सत्र न्यायाधीश निलंबित
मुंबई : महिला कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक छळवणुकीच्या आरोपाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. टी. गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. गायकवाड यांच्याकडे अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खटले चालविण्यात येत होते.
गायकवाड यांच्यावरील आरोपांच्या प्राथमिक चौकशीत तथ्य आढळून आल्यानंतर गेल्या १४ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार शालिनी जोशी- फणसाळकर यांनी स्पष्ट केले.

आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची मदत दुप्पट
मुंबई: नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय बुधवारी रात्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शरणागती पत्करणाऱ्यांना दीड लाख ते २० लाखांपर्यंत मदत मिळणार आहे. तसेच नक्षलग्रस्त भागात विकासकामे गतीने व्हावीत यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

धनगर आरक्षणातून सरकारने अंग काढले
मुंबई: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यावरून सुरू झालेला वाद विकोपास गेल्याने आणि आता त्याचा राजकीय फायदाही होण्याची शक्यता नसल्याने आता या वादातूनच अंग काढून घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. त्यानुसार या समाजाचा तिसऱ्या अनुसूचित समावेश करण्याबाबत केंद्राला विनंती न करता धनगर समाजाच्या सर्वच मागण्या केंद्र सरकारला पाठविण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे समजते. धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

अपंग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ
मुंबई: दहावी तसेच दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेचा लाभ ३२ हजार ३४४ विद्यार्थ्यांना मिळेल. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सध्या दरमहा ५० रुपये देण्यात येतात. यात थेट १०० टक्के वाढ करून आता १०० रुपये दरमहा देण्यात येतील. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सध्याच्या ७५ रुपयांऐवजी १५० रुपये दरमहा मिळतील.

पोलीसाचे दात पाडणाऱ्यांना सक्तमजूरी
ठाणे:बारमधील गोंधळ सोडविण्यासाठी गेलेल्या नवी मुंबईतील पोलीसांवर हल्ला करणाऱ्या व त्यातील एका पोलीस शिपायाचा दात पाडणाऱ्या नरसिंग साबद (३०) व अ‍ॅनीस कोनीकेरा (३२) या दोघांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा न्यायाधीश एस. जी. गिरीधारी यांनी सुनावली.