मुंबई : राज्यात मागील काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फुलांच्या शेतीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दादर, नवी मुंबईसह ठाणे येथील प्रमुख फुलबाजारांत फुलांची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्यामुळे बाजारपेठांमध्ये फुलांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान, मागील दोन दिवस दादर फुलबाजारात झेंडूची आवक अगदीच कमी झाली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांची आवक घडल्यामुळे बाजारपेठांमध्ये चिंतेचा सूर दिसत आहे.
याआधी साधारण प्रति किलो ८० ते १०० रुपये दराने फुलांची विक्री होत होती. मात्र, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने झेंडू, मोगरा, गुलाब, चाफा यांसारख्या फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी, गणेशोत्सवाच्या काळात फुलांची मागणी वाढणार असली तरी आवक मात्र कमी राहील, असा अंदाज फुल विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गणपतीत साधारण झेंडूचा प्रति किलो १६० ते २०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, गणपतीत आरास आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात फुलांचा वापर होतो.
घरगुती गणपतीसोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सजावटीसाठी झेंडू आणि इतर फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे भाव आणखी वाढण्याची शक्यता असून ग्राहकांना फुलांसाठी अधिक रक्कम खर्च करावी लागणार आहे, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याचबरोबर दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी शेतकऱ्यांकडून बाजारात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत असते. मात्र यंदा पावसामुळे परिस्थिती वेगळी असून विक्रेत्यांना फुलांचा तुटवडा भासणार आहे, असे फुल विक्रेते महेंद्र यादव यांनी सांगितले.
गतवर्षी याच कालावधीत झेंडू प्रति किलो ८० ते १०० रुपये दराने विकला जात होता. तर गुलाब, मोगऱ्याचे दरही यंदापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी कमी होते. मात्र यंदा ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत फुलांना पावसाचा थेट फटका बसल्याने भाव दुप्पट होणार आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवात दादर फुलबाजारात रोज साधारण ३५० ते ४०० टन फुलांची आवक होत होती, यंदा इतकी होईल की नाही शंका आहे, असे फुल विक्रेत्यांनी सांगितले.
इतर फुलांचे भाव चढेच
झेंडूव्यतिरिक्त रंगिबेरंगी गुलाब, चाफा, मोगरा आदी फुलांचे दर येत्या दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. सध्या चाफ्याची पाच फुले २० रुपयांना मिळत आहेत. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. लाल, केशरी, सफेद, गुलाबी रंगाच्या सहा गुलाबांची जुडी ८० ते ९० रुपये दराने विकण्यात येत होती. काही दिवसांनी त्यात ५० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
दादर फुलबाजारात दररोज फुलांचे ५० ट्रक येतात. मात्र, दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने फुले भिजल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात पाठवता येत नाहीत. परिणामी फुलांची आवक कमी झाली आहे.- मोहन पाटील, घाऊक फुल विक्रेते,दादर फुलबाजार