मुंबई : ‘प्रत्येकाने स्वतःपासून पर्यावरण संवर्धन व रक्षणाला सुरुवात करायला हवी. या जबाबदारीचे भान नवीन पिढीने ओळखायला हवे. कचऱ्यात फेकण्यात येणाऱ्या वस्तूंपासून नवीन वस्तू तयार करून प्रदूषणावर नियंत्रण मिळवायला हवे’, असे मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी डी. वाय. पाटील विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणातील अर्थशास्त्र’ या विषयावरील परिषदेत व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि नवी मुंबईतील डी. वाय.पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरुळ येथील डी. वाय. पाटील विद्यापीठ संकुलात ‘पर्यावरणातील अर्थशास्त्र’ या विषयावर आधारित एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सिद्धेश कदम म्हणाले की, ‘कचऱ्यात फेकण्यात येणाऱ्या वस्तूंपासून नवीन वस्तू तयार केल्या जातात. परंतु या वस्तूंचा वापर केल्यानंतर परत कचऱ्यात फेकून देण्यापेक्षा त्यातूनही नवीन वस्तू तयार केली जाऊ शकते. त्यासाठी ‘टेक, मेक, डिस्पोजल व परत एकदा मेक’ असा वेगळा विचार करायला हवा’.

सध्या प्रदूषणाचे काही प्रश्न गंभीर आहेत. मात्र तरीही अनेक संस्था पुढाकार घेऊन टाकाऊ वस्तूंपासून नवीन वस्तूंची निर्मिती करीत आहेत. यासाठी जालना आणि जळगाव या ठिकाणच्या काही प्रमुख आस्थापनांची उदाहरणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या निमित्ताने पर्यावरणविषयक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून लवकरच नागपूर, पुणे, कोल्हापूर येथेही पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.