मुंबई : राज्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल, असे शालेय शिक्षण विभागाने एका शासन शुद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केल्यानंतर वादाची ठिणगी पडली आहे. विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत असून मराठी मनोरंजनसृष्टीतूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा नुकताच दर्जा मिळाला. मात्र तरीही या विषयावर इतकं बोलावं लागत आहे, हेच किती दुर्दैव आहे, असे म्हणत प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर याने हिंदी भाषेच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
‘आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा नुकताच दर्जा मिळाला. मात्र तरीही या विषयावर इतकं बोलावं लागत आहे, हेच किती दुर्दैव आहे. आपण एक नागरिक म्हणून किती ग्राह्य धरले गेलो आहोत, याचे हे उदाहरण. परराज्यातून आक्रमण चालू आहे, त्याला आपला आळस, उदासीनता आणि निष्क्रियताच जबाबदार आहे. हे आपण विसरायला नको’, असे मत मंगेश बोरगावकर याने समाजमाध्यमावर व्यक्त केले आहे. तसेच पुढील काळात मराठी बोलण्यावरही बंदी झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असेही तो म्हणाला.
‘राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४’नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल. परंतु विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास, त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल. तथापि, हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान २० इतकी असणे आवश्यक राहील.
हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता उपरोक्तप्रमाणे विहित किमान २० विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शविल्यास, त्या भाषेच्या अध्यापनाकरिता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषा ही ऑनलाइन पध्दतीने शिकविण्यात येईल. सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल, असे शालेय शिक्षण विभागाने १७ जून २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन शुद्धिपत्रकात स्पष्ट केले आहे.