मुंबई : कूपर रुग्णालयामध्ये दोन रुग्णांना उंदराने चावा घेण्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. मात्र मागील दोन महिन्यांमध्ये कूपर रुग्णालयामध्ये सहा रुग्णांना उंदीर चावल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिली. या प्रकरणांची जुहू पोलिसांकडे आपत्कालीन पोलीस अहवालामध्ये नोंद करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये अस्वच्छतेमुळे उंदरांचा सुळसुळाट झाला होता. त्यातच महिला रुग्ण कक्षामध्ये ५ सप्टेंबर रोजी उंदीर दोन रुग्णांना चावल्याच्या घटना उघडकीस आल्या. या संदर्भात माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने साफसफाईबाबत नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली. या समितीने तातडीने कारवाई करून सफाई करणाऱ्या कंत्राटदारावराकडून रुग्णालयाची सफाई करून घेतली. तसेच प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उंदीर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. तसेच रुग्ण व नातेवाईकांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यामुळे उंदरांची संख्या आटोक्यात आली.
कूपर रुग्णालयामध्ये मागील दोन महिन्यांमध्ये सहा रुग्णांना उंदीर चावल्याची माहिती पोलिसांनी माहितीच्या अधिकारामध्ये उपलब्ध दिली. उंदीर चावल्याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यामध्ये आपत्कालीन पोलीस अहवालामध्ये (इपीआर) नोंद करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश घटना सप्टेंबरमध्ये घडल्याचा अंदाज आहे. उंदीर चावल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडल्यानंतर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी फक्त दोनच घटना घडल्याचे स्पष्ट केले होते. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीवरून रुग्णालय प्रशासनाकडून उंदीर चावल्याच्या घटना लपविण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे.
त्याचप्रमाणे उंदीर चावण्याच्या इतक्या घटना घडल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्याऐवजी त्याला कारणे दाखवा नोटीस व अल्प दंडात्मक कारवाई करून अभय देण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला. त्यानंतरही कंत्राटदाराकडून सफाईकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे नुकतेच रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपावरून स्पष्ट झाले आहे.
कूपर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना उंदीर चावल्याच्या घटना सप्टेंबरमध्ये उघडकीस आल्यानंतर या घटनांबाबत माहिती अधिकारातून माहिती घेण्यात आली. त्यावेळी रुग्णालयात सहा घटना घडल्याचे लक्षात आले. रुग्णालयातील गैरव्यवस्थापन किंवा अंतर्गत कलहाचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. प्रशाासनाच्या गलथानपणाचा फटका रुग्णांनी का सहन करावा, असा प्रश्न माहिती अधिकारी कार्यकर्ता चेतन काेठारी यांनी उपस्थित केला.