मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली फेरी ७ जुलै रोजी संपुष्टात आली. या फेरीमध्ये ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असले तरी राज्यभरातील विविध महाविद्यालयांनी निरनिराळ्या कारणास्तव ६ हजार ४०२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले. यापैकी दोन हजार १९३ विद्यार्थ्यांनी कोट्यांतर्गत प्रवेशासाठी प्रयत्न केला होता. मात्र त्यांना कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश नाकारला.

राज्यभरात यंदा प्रथमच अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. अकरावी प्रवेशासाठी राज्यामध्ये ९ हजार ४६९ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ७२० इतक्या जागा उपलब्ध आहेत. यातील १६ लाख ७० हजार ५९८ नियमित फेऱ्यांसाठी, तर ४ लाख ५३ हजार १२२ जागा कोट्यांतर्गत प्रवेशासाठी राखीव आहेत. शिक्षण संचालनालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या फेरीनंतर ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये कोट्यांतर्गत ७५ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर नियमित फेरीअंतर्गत ४ लाख ३२ हजार २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मात्र राज्यातील महाविद्यालयांनी विविध कारणास्तव ६ हजार ४०२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले आहेत. यामध्ये कोट्यांतर्गत प्रवेशासाठी प्रयत्न केलेल्या २ हजार १९३ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश नाकारले आहेत. त्याखालोखाल विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणारे २ हजार ४९५, तसेच वाणिज्य शाखेसाठी ९५६ आणि कला शाखेसाठी ७५८ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले आहेत. योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी दिली.

यामुळे नाकारण्यात आले प्रवेश

विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये चुकीची माहिती भरली, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र आदी सादर न करणे, अर्जामध्ये चुकीचे गुण भरणे अशा कारणांसाठी कनिष्ठ महाविद्यालयानी प्रवेश नाकारले आहेत. मात्र प्रवेश नाकारण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती श्रीराम पानझडे यांनी दिली.

१ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी रद्द केले प्रवेश

अधिक चांगले महाविद्यालय मिळावे यासाठी १ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या सर्वाधिक ७८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. त्याखालोखाल कला शाखेत प्रवेश घेतलेल्या ४३१ आणि वाणिज्य शाखेतील ३६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. कोट्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या ३६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या व तिसऱ्या फेरीतून ७७ हजार विद्यार्थी बाद

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. त्यापैकी ३ लाख ७५ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तसेच ३ हजार २८४ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी प्रवेश नाकारला तर, १ हजार १८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या ७७ हजार ६६२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला नाही. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश न घेतल्याने नियमानुसार हे विद्यार्थी दुसऱ्या व तिसऱ्या फेरीतून बाद होणार आहेत. या विद्यार्थ्यांना आता विशेष फेरीमध्ये प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कागदपत्रांअभावी रद्द करण्यात आले, त्या विद्यार्थ्यांना मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे.