महाराष्ट्र हा अखंडच राहिला पाहिजे, असे सांगून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला. राज्याचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाची भूमिका मांडली असली तरी त्यामागचा बोलविता धनी वेगळाच असल्याचेही राज म्हणाले. विदर्भाला विरोध करताना केंद्राकडून गाजावाजा केली जात असलेली स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्र सरकारची ही ‘स्मार्ट लुडबूड’ असून महापालिका स्वायत्त असताना असले ‘स्मार्ट उद्योग’ खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही राज यांनी दिला.
मुख्यमंत्री विदर्भाचेच असताना महाराष्ट्राचा तुकडा पाडावा, असे वाटतेच कसे, असा सवालही त्यांनी केला. राज्याचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांना स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा मांडण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल करत त्यांनी राजकीय विषयात बोलण्याचे काहीही कारण नव्हते असेही राज यांनी ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, माजी मंत्री गणेश नाईक यांनीही या योजनेवर टीका केली. ते म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेत लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे आधी पालिका बरखास्त करावी आणि नंतरच स्मार्ट सिटी योजना राबवावी; परंतु नवी मुंबईला स्मार्ट सिटी योजनेची गरज नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत केंद्राच्या स्मार्ट सिटीला विरोध करीत राहीन.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेवर टीका करण्याआधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या योजनेचा गृहपाठ करावा आणि मगच बोलावे.
-आशीष शेलार, मुंबई भाजपाध्यक्ष