मुंबई : राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी हजारो किमी लांबीचे रस्त्यांचे जाळे विणण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) आहे. आता महामंडळ रस्ते तयार करण्याबरोबरच सौरऊर्जा निर्मिती क्षेत्रातही उतरले आहे. नागपूर – मुंबई मसृद्धी महामार्गावरील वाशिम, कांरजालाड आणि बुलढाणा, मेहकर आंतरबदल येथे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाद्वारे पाच मेगावॉट वीजनिर्मितीस सुरुवात झाली आहे.

मुंबई – नागपूर अंतर केवळ आठ तासात पार करता यावे यासाठी एमएसआरडीसीने ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधला आहे. हा महामार्ग टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला असून सध्या संपूर्ण महामार्ग सेवेत दाखल आहे. या महामार्गावरून आतापर्यंंत दोन कोटींहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. दरम्यान, या महामार्गालगत कृषी केंद्र, औद्योगिक केंद्र, टाऊनशीपसह सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. त्यानुसार महामार्गालगतच्या काही आंतरबदल मार्गावर २०४ मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.

या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात कारंजालाड आणि मेहकर येथे नऊ मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत पाच मेगावॉट वीजनिर्मितीला सोमवारपासून सुरुवात झाल्याची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली. कारंजालाड येथे ३ मेगावॉट, तर मेहकर येथे दोन मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे.

एमएसआरडीसीची विशेष उद्देश वाहन कंपनी महासमृद्धी रिन्युएब्ल एनर्जी लिमिटेड आणि महावितरण यांच्या दरम्यान २०२२ मध्ये झालेल्या करारानुसार सौरऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेची विक्री करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना १ अंतर्गत निविदा प्रक्रियेत भाग घेत महामंडळाने प्रति युनिट ३.०५ रुपये दर दिला होता. भविष्यात एमएसआरडीसी सौरऊर्जा निर्मितीसाठीही ओळखली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पथकर वसुलीव्यक्तिरिक्त उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत उपलब्ध झाला आहे.