मुंबई : मुक्या आणि कर्णबधिरांना संकटकाळी तात्काळ मदत मिळावी आणि त्यांच्या अडीचडचणी तात्काळ सोडवता याव्यात या उद्देशाने मुंबईतील अमन आझाद यांनी news4deaf.com या संकेतस्थळावर आधारित एसओएस ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संकटकाळात मुक्या आणि कर्णबधिरांना एका संदेशाच्या आधारे मदतीसाठी थेट पोलीस ठाणे व रूग्णालयाशी थेट संपर्क साधता येणार आहे.
या सुविधेसाठी मुके आणि कर्णबधिरांना सर्वप्रथम news4deaf.com या संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर आपल्याला मदतीच्या अनुषंगाने पोलीस https://news4deaf.com/police-help/ अथवा https://news4deaf.com/hospital/ रुग्णालयाच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. थोडक्यात आपली अडचण लिहायची आहे आणि त्यानंतर ‘एसओएस’वर क्लिक केल्यानंतर स्वतःच्या मोबाइलमधील संदेश (टेक्स्ट मेसेज) संबंधित विभागात पोहोचाल. त्यामध्ये तुमचे लोकेशन, नाव आणि संबधित व्यक्ती मुकी व कर्णबधिर असून मदतीची गरज असल्याचे नमूद असलेला एक संदेशच तयार असेल. अडचणीसंदर्भातील हा संदेश तुम्ही ज्या ठिकाणी असाल, त्या ठिकाणचे पोलीस ठाणे व रूग्णालयाच्या संपर्क क्रमांकावर पाठवता येणार आहे.
‘मुके आणि कर्णबधिरांना संकटकाळी मदत होण्याच्या उद्देशाने एसओएस ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. हे ॲप्लिकेशन जगभरात कुठेही वापरता येईल. यामध्ये जगभरातील देशांचे संपर्क कोड समाविष्ट आहेत. या ॲप्लिकेशनचा भारतातील मुक्या आणि कर्णबधिरांना फायदा होण्याच्या उद्देशाने संबधित विभागाशी चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे अमन आझाद यांनी सांगितले.